आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कंपनीने सरासरी २.५५ रुपये प्रती युनिट म्हणजे ३७ टक्के वीज दरवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा अतिरिक्त भार ग्राहकांना शाॅक देणारा आहे. ही दरवाढ राेखण्यासाठी यंत्रमागाचे केंद्र असलेल्या शहरांमधून संघटितपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल यांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी लवकरच आंदाेलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा गुरुवारी (दि. २) मुंबईत झालेल्या बैठकीत दिला.
मुंबईच्या काळा घाेडा भागातील घिया हाॅलमध्ये राज्यभरातील यंत्रमाग उद्याेजक, ग्राहक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शेती व्यवसायानंतर यंत्रमाग उद्याेगातील सर्वाधिक राेजगारनिर्मिती हाेते. वीज दरवाढ झाली तर मालेगावची गरीब जनता, यंत्रमाग उद्याेग व इतर व्यवसाय अडचणीत सापडतील.
कुठल्याही परिस्थितीत नवीन दरवाढ लागू हाेणार नाही यासाठी लढा देण्यासाठी एकजूट हाेण्याचे आमदार मुफ्ती यांनी आवाहन केले. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप उघाडे, महाराष्ट्र चेंबर असाेसिएशनचे ललित गांधी, यंत्रमाग उद्याेजक युसूफ इलियास, जनता दलचे सचिव मुस्तकिम डिग्निटी आदींनी मनाेगत व्यक्त करत आंदाेलनावर एकमत दर्शविले. याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी साजिद अन्सारी, उमैर अन्सारी, हाफिज अब्दुल्ला, खालिद सिकंदर, आफताब आलम यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री व अॅग्रीकल्चर संघटना तसेच इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर अॅण्ड इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन काे - ऑर्डिनेशन कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते.
राज्य सरकारने हस्तक्षेप करावा
देशातील अन्य राज्यांतील वीजदर विचारात घेतले तर आजच आपण पहिल्या क्रमांकावर म्हणजे सर्वाधिक वरच्या पातळीवर आहोत. त्यात अशी अतिरेकी भर पडल्यास त्याचे राज्यव्यापी प्रचंड परिणाम होणार आहेत आणि शेवटी प्रत्यक्ष वीज वापरणारा ग्राहक हाच या एकूण व्यवस्थेमध्ये बळीचा बकरा ठरणार आहे. यासाठी राज्य सरकारने यामध्ये राज्याच्या हिताच्या दृष्टीने त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. राज्याच्या विकासाच्या आणि हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय व्हावेत यासाठी आवश्यक बाबींची अंमलबजावणी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अध्यक्ष अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली.
न्यायालय आदेशाला फासला हरताळ
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार २०२२-२३ सालासाठी आयोगाने सरासरी वीज देयक ७.२७ रु. प्रति युनिट या दरास मान्यता दिलेली आहे. तथापि इंधन समायोजन आकार गृहीत धरून हा सध्याचा सरासरी देयक दर ७.७९ रु. प्रति युनिट दाखविला आहे. इंधन समायोजन आकारात अदानी पॉवरचा वाटा मोठा असल्याचे भान ग्राहकांनी ठेवणे आवश्यक आहे. २०२१-२२ मध्ये राज्याला लागणाऱ्या एकूण विजेपैकी १८ टक्के वीज अदानी पॉवर कडून सरासरी ७.४३ रु. प्रति युनिट दराने खरेदी केली आहे . महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी २०२३-२४ मध्ये ८.९० रु. प्रति युनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रु. प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी केली आहे.
सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे १४% व ११% दाखविली आहे. ही ग्राहकांच्या डोळ्यांत धुळफेक करणारी आकडेवारी आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रु. प्रति युनिट म्हणजे ३७% आहे. १०% च्या वर दरवाढ हा टॅरिफ शॉक ठरतो. त्यामुळे १०% हून अधिक दरवाढ करता कामा नये. या विद्युत अपिलीय प्राधिकरण नवी दिल्ली या न्यायालयाच्या आदेशांना हरताळ फासून ही अतिरेकी मागणी केल्याचा आरोप बैठकीत केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.