आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात सर्वपक्षीय नेते:पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरी -आंबेदरी धरणाचा मूळ कालवा बंद करून बंदिस्त कालव्याच्या पाणी नेण्याचा घाट पालकमंत्री दादा भुसे यांनी घातला आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी दि. ७ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याचीच परिणिती म्हणून प्रकल्पबाधित शेतकरी गणेश गंजीधर कचवे रा. दहिदी यांनी आंदोलनस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पालकमंत्री भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षक भरती यांना निवेदन दिले. बोरी-आंबेदरी बंदिस्त कालव्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. माजी मंत्री स्व. डॉ. बळीराम हिरे यांच्या कार्यकाळात बोरी-आंबेदरी धरण बांधले आहे. माजीमंत्री पुष्पा हिरे यांच्या कार्यकाळात या धरणाचा कालवा तयार करून माळमाथ्यावरील कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला. बोरी-आंबेदरी बंदिस्त कालव्याला शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायतींचा विरोध आहे.

तसा ठराव करून संबंधित विभागाकडे यापूर्वीच सादर केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी २८ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. दोघे आंदोलनकर्ते शेतकरी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अद्वय हिरे, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, सुनील गायकवाड, निखिल पवार, राकेश भामरे, शेखर पगार, जितेंद्र देसले, भरत पाटील, भारत म्हसदे, अशोक आखाडे, नंदू सावंत, मदन गायकवाड, गुलाब पगारे, जयेश आहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आत्महत्या वाढतील : बंदिस्त कालवा विरोधात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. या योजनेस सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. सदरच्या काळव्यामुळे परिसरातील चार ते पाच गांवामधील शेती कोरडवाहू होऊन शेतकरी हे शेतमजूर होतील. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...