आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:20 पाणवठ्यांवर होणार वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण; मालेगाव वन क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला पोहाणेच्या पाणवठ्याजवळ उभारणार मचान

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन क्षेत्रात वावरणाऱ्या विविध वन्य प्राण्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि.१६) बुध्द पौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत २० पानवठ्यांवर रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करून प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. पोहाणेच्या पानवठ्यावर वन्यजीवांचा अधिक वावर असतो. त्यामुळे या ठिकाणी मचान उभारुन निरीक्षण होणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी दिली.

मालेगाव उपविभागीय कार्यालयाच्या क्षेत्रात सटाणा व मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. साधारण ३५ हजार हेक्टरवर जंगल परिसर आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे निरीक्षण नोंदी झाल्या नाहीत. मात्र, यंदा कोरोनाचे संकट निवळल्याने दोन वर्षांनंतर प्राणी निरीक्षण नोंदी करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे.

जंगल क्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का, वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे की घट, नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का अशा प्रकारची माहिती मिळणार आहे. निवडक पाणवठ्यावर बसून वन कर्मचारी प्राण्यांच्या होणाऱ्या हालचाली टिपणार आहेत. पारंपरिक पद्धतीने बुद्ध पौर्णिमेला सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेदरम्यान हे निरीक्षण नोंदविले जाईल. बीटनुसार पाणवठ्यांवर रात्रभर पहारा ठेवून वनविभागाचे कर्मचारी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची नोंदी घेतील. यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जंगलातील वन्यप्राण्यांची आकडेवारी समोर येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...