आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील गावागावांत कृषी विभागामार्फत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी दिली. तृणधान्यांमधील पोषण मूल्यांमुळे त्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य म्हणून करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर पिकांच्या उत्पादनात वाढ करून नागरिकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
तृणधान्यांचा आहारात समावेश होण्यासाठी व नागरिकांत जनजागृती निर्माण होण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुक्यातील गावागावांत जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा, कृषी सेवा केंद्रे, लग्नसमारंभ, प्रक्षेत्र भेटी, वस्त्यांवर जाऊन तृणधान्याचे आहारातील महत्त्व व पौष्टिक गुणधर्म याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. खरीप हंगामात तृणधान्याची पेरणी करण्याबाबत शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत कृषी सहायक रोमा आहेर यांनी खेलदरी व शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना नागली पापड वाटप केले. तृणधान्यांची व्यापक प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने बोपाणे येथे कृषी सहायक शिरीष पवार यांनी शिक्षक गांगुर्डे व पावरा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली व त्यानंतर विद्यार्थ्यांना नागली पापड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक बधान, शिक्षक गुंजाळ, भामरे, कुवर, वैद्य आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.