आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:वितरणातील गाेंधळ; मुबलक पाणी तरीही मनमाडकरांची घागर रिकामीच

मनमाड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणासह पाटाेदा साठवणूक तलाव व रेल्वेचा बंधारा तुडुंब भरला आहे. वागदर्डीच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्गही सुरू असून हे पाणी वाया जात असताना केवळ वितरण व्यवस्थेतील घाेळामुळे मनमाडकरांना १३ ते १४ दिवसांआड पाणीपुरवठा हाेत आहे. सध्याच्या वितरण व्यवस्थेत मनमाडकरांची पाण्याची गरज दरमहा सरासरी १० तर वार्षिक किमान १२० दशलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत धरणात व साठवणूक तलावात १३८ दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उदंड झाले साठविलेले पाणी, पण घरातील घागर मात्र रिकामी अशी अवस्था मनमाडकरांची झाली आहे.

गेली चार वर्षे गणेशोत्सवानंतर ओव्हरफ्लो होणारे वागदर्डी धरण यंदा एक महिना आधीच ओसंडून वाहू लागले आहे. रेल्वे बंधाऱ्यासह पाटोदा साठवणूक तलावही भरला आहे. मुबलक पाणी असूनही शहराच्या पाणी पुरावठ्यात मात्र काहीच सुधारणा झालेली नाही. उलट दररोज हजारो लिटर वाया जाणारे पाणी पाहून मनमाडकरांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. चार वर्षांपासून वरुणराजाने कृपा दाखविल्यामुळे मनमाडला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.

मात्र, पाणी वितरणाची ‘मॅन मेड’(मानवनिर्मित) समस्या कायम असल्याने मनमाडकरांची टंचाई मात्र मिटलेली नाही. यंदा धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणात ६८.८ साठा असून धरणाच्या सांडव्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचे व वितरणाचे सुयोग्य नियोजन प्रशासनाने केले तर उन्हाळ्यात मनमाडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, अशी चर्चाही आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने अडचण
सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने याही परिस्थितीत पालिका फक्त ११ ते १२ दिवसांआडच पाणी पुरवू शकते. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व महावितरणने किमान वागदर्डी जलशुद्धीकरण केंद्रावर तरी अविरत २४ तास वीजपुरवठा सुरू ठेवावा.
डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी व प्रशासक, मनमाड

वागदर्डी धरणात ११० दलघफू पाणी उपलब्ध
१२ दलघफू क्षमतेचा रेल्वेचा महादेव बंधाराही भरला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे ११० दलघफू क्षमतेचे वागदर्डी धरणही भरले आहे. दुसरीकडे पालखेड धरणातून कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने मनमाडसाठीचा १६ दलघफू क्षमतेचा पाटोदा साठवणूक तलावही संपूर्ण भरला आहे. त्यामुळे मनमाडसाठी १३८ दलघफू पाणीसाठा उपलब्ध असूनही मनमाडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त हाेत आहे.

वाहून जाणारे पाणी अडविणे गरजेचे
वागदर्डी धरणातील सांडव्यावरून भरपूर पाणी वाया जात आहे. या सांडव्यावर लाकडी फळ्या टाकून वाया जाणारे पाणी अडवल्यास जवळपास एक ते दीड महिन्याचा पाणीसाठा धरणात शिल्लक राहील. नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात.
पवन राय, नागरिक, मनमाड

बातम्या आणखी आहेत...