आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूलभूत शिक्षणाची बीजे अंगणवाडीत रुजवली जातात. हसतखेळत शिक्षणासोबत पूरक पोषण आहार देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी या अंगणवाड्यांमध्ये लागावी असा शासनाचा उद्देश असतो. मात्र, जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील तब्बल ५७८ मोठ्या व ५०९ मिनी अंगणवाड्यांना इमारतच नसल्याने जवळपास एक लाखाहून अधिक मुलांची त्रेधातिरपीट सुरू आहे. कधी समाजमंदिर, कधी खासगी अडगळीत पडलेल्या खोल्या तर कधी मंदिरात या चिमुकल्यांना बसवून अध्यापनाचे दिव्य कार्य अंगणवाडीसेविकांना पार पाडावे लागत आहे.
महिला व बालकल्याण विभागावर केवळ तीन टक्के खर्च करण्याची तरतूद असल्याने मोठ्या अंगणवाड्यांनाही इमारतीसाठी निधी मिळणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मिनी अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी निधीची तरतूदच करत नाही. एकूणच शासनाकडून पूर्व प्राथमिक मूलभूत शिक्षणाची थट्टा सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मोठ्या आणि मिनी अंगणवाड्यांना शासनाने इमारत पुरवणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
वाढती लोकसंख्या विचारात घेता अंतराचे नियोजन करत वाड्या- वस्तीवरील छोट्या मुलांना जवळपासशिक्षण घेता यावे, यासाठी मिनी अंगणवाड्यांची संकल्पना राज्यभरात रुजली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनेक मिनी अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मान्यता देताना तेथील मुलांना बसण्यासाठी इमारत आहे किंवा नाही याची खात्री एकात्मिक बालविकास विभाग करत नाही. बऱ्याचदा मळ्यातील पडवीत, अडगळीत पडलेल्या खोलीत या मुलांना बसवले जाते. पावसाळ्यात मुलांची बसण्याची गैरसोय होत असल्याने अंगणवाडीसेविकांनाही नाइलाजास्तव चिमुकल्यांना सुट्टी द्यावी लागते.
मिनी अंगणवाड्यांना इमारती गरजेच्या : इमारती नसल्यामुळे मिनी अंगणवाड्यांमधील बालकांची ससेहोलपट होते. मोठ्या अंगणवाड्यांमध्ये रंगवलेल्या बोलक्या भिंती चिमुकल्यांना खिळवून ठेवतात. खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये मात्र अशी कुठलीच व्यवस्था नसते. उघड्यावर मुलांना शिकवताना त्यांचे लक्षही विचलित होते. - सविता कुऱ्हाडे, अंगणवाडीसेविका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.