आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सिन्नरकरांचे आरोग्य रामभरोसे

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुसज्ज इमारत असलेल्या सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वानवा असल्याने सामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या सिन्नर शहराची आरोग्यसेवा त्यामुळे रामभरोसे आहे. शासनाने तत्काळ येथील पदभरती करून पूर्ण क्षमतेने हे रुग्णालय सुरू करून सिन्नरकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना साकडे घातले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात नामांकित दर्जाचे एमबीबीएस डॉक्टर, एमएस सर्जन आदी पदविकाप्राप्त डाॅक्टरांबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, एमआरआय या सुविधा उपलब्ध करून रुग्णालय अद्ययावत करण्यात यावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे, पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालावे, अशा आशयाचे निवेदन कोतवाल यांनी पाठविले आहे. शहरातील संजीवनीनगर येथील अशोक कारभारी पाटोळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्याने रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे समोर आले आहे.

कोरोना महामारीत या उपजिल्हा रुग्णालयाने चांगली कामगिरी बजावत शहरवासीयांचा विश्वास संपादन केला होता.‌ त्यामुळे नागरिकांचा शासकीय आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.‌ गरीब व सर्वसामान्य नागरिकांसह उच्चभ्रू असणाऱ्या घटकांनीही या रुग्णालयात शासकीय सुविधांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेबद्दल अपेक्षा वाढलेल्या आहेत.‌ शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारले आहे.‌ महिलांच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, सिझर, सर्पदंश, साथीचे आजार, सामान्य उपचार, प्रसूती रुग्ण येथे येत असून सुविधा नसल्याने रुग्णांना नाइलाजाने खासगी दवाखान्यात अथवा इमर्जन्सी नाशिकला जावे लागते.‌ रुग्णालयातून तसे रेफर केले जाते.

औद्योगिक वसाहतींचाही भार...
सिन्नर शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या शासकीय माळेगाव औद्योगिक आणि मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेला ईएसआयसी दवाखानाही प्रायमरी तत्त्वावर सुरू आहे. येथील जवळपास ५० हजार कामगारांच्या आरोग्याचा भारही सिन्नर उपजिल्हा रुग्णालयावरच आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी स्वतंत्र दवाखाना उभारण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. एका बाजूला वाढलेली महागाई व वैद्यकीय व्यवसायातील आर्थिक बाबतीत होणारी लूट ही भयावह आहे. त्यामुळे उपचारांवर होणारा भरमसाठ खर्च सामान्यांना पेलणे अवघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...