आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.३) ईद -उल -फित्र अर्थात रमजान ईदचा सण साजरा केला जाणार आहे. कोरोना निर्बंध हटल्याने १५ अटी व शर्तींसह विविध १४ ठिकाणी ईदगाह मैदानांवर सामुहिक नमाज पठणास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजता जामा मशिदीचे पेश इमाम तथा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली मुख्य इदगाहवर नमाज अदा होईल. पोलिसांनी शहरात सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून ३ ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
साेमवारी सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाले. चंद्र नजरेस पडताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. महिनाभर रोजे, नियमित नमाज, विशेष तरावीहचे नमाज पठण अशा दिनचर्येमुळे पूर्व भागात उत्साह होता. कोरोनाचे सावट दूर झाल्याने दोन वर्षानंतर निर्बंध हटविण्यात आले आहे. चंद्रदर्शन झाल्याने नागरिकांनी चांद रातचा मुहूर्त साधून उर्वरित खरेदीसाठी गर्दी केली होती.
पोलिस महसूल व मनपा प्रशासनाने ईदच्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली आहे. वजूसाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले आहेत. अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.