आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना सूचना:येवला औद्योगिक वसाहतीत गुंतवणुकीसाठी अधिक नवउद्योजकांना करा प्रोत्साहित; मंत्री छगन भुजबळ यांनी केली पूर्ण झालेल्या सुविधांची पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना

​​​​​​​येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी औद्योगिक वसाहतीत उद्योगांच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत उद्योजकांना माहिती देण्यात यावी व तातडीने भूखंड वाटपाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केली. चिचोंडी येथील औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पाहणी व औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रात रस्ता, वीज व पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोठ्या उद्योगांना आणण्यासाठी अधिक वाव असल्याने याबाबतची उद्योजकांना माहिती देण्यात यावी. माहितीसाठी एमआयडीसीचे दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावावेत. या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व सांडपाणी यांची योग्य व्यवस्था करण्यात यावी. येवला औद्योगिक क्षेत्र परिसर व अंतर्गत रस्त्यांलगत पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रायते-पारेगाव रस्त्याचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करावे. अंगणगाव ते चिचोंडी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे हस्तांतरीत करून तातडीने पूर्ण करावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्योजकांसाठी एमआयडीसीचे सुविधा केंद्र चालू करून येथे कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. विंचूर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे निकामी वीज रोहित्र तातडीने बदलवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पाणीपुरवठा योजना, रस्ते व सांडपाणी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, दळणवळण संलग्नता, अग्निशामक व्यवस्था, भूखंड वाटप याबाबतचा आढावा कार्यकारी अधिकारी जयवंत बोरसे यांनी सादर केला. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील, उपअभियंता जे. पी. पवार, उमेश पाटील, सागर चौधरी, एस. एस. पाटील, विजय चौधरी, वरिष्ठ भूमापक जयेश त्रिभुवन, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. डी. जाधव, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...