आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी शिवजयंतीला तत्कालीन कृषिमंत्री व विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन झाले. वर्षभराचा कालावधी लोटला तरी काम शून्य आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच सुशोभिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीकरता आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व शिवप्रेमी नागरिकांनी शनिवारी शिवतीर्थाजवळ धरणे आंदोलन केले. सुशोभीकरण कामाला वर्षभराचा विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसरातील सुशोभीकरण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमी संघटना करीत आहेत.
गेल्या वर्षी दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी मंत्री भुसे यांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र काम सुरू झाले नाही. त्यामुळे महानगर पालिका प्रशासन व मंत्री भुसे यांनी शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
कामात झालेल्या दिरंगाईची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, शिवतीर्थाचे तत्काळ सुशोभीकरण सुरू करावे,अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनात निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, मदन गायकवाड, रामदास बोरसे, प्रा. अनिल निकम, जितेंद्र दिसले, भरत पाटील, कैलास तिसगे, गुलाब पगारे, शेखर पगार, क्रांती पाटील, कैलास शर्मा, विवेक वारुळे, सतीश कलंत्री, दिनेश पाटील सहभागी झाले होते.
कार्यवाहीचे आश्वासन
महापालिका सहायक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन घेतले. शिवतीर्थ सुशोभीकरणाबाबत सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन आराखडा अंतिम केला जाईल. शिवजयंतीनंतर तत्काळ काम सुरू तसेच आंदोलकांच्या सूचनांवर योग्य कार्यवाही करू असे आश्वासन यावेळी त्यानी दिले.
या’ संघटनांनी घेतला सहभाग
शिवजयंती उत्सव समिती, सार्वजनिक गणेशाेत्सव समिती, क्रांतिसूर्य महात्मा जाेतिबा फुले स्मारक कृती समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, सार्वजनिक एकता मंच मालेगाव कॅम्प व सर्वपक्षीय शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.