आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:रेल्वेच्या प्रवासात साध्या-साध्या चुकाही ठरतात गुन्हा ; मनमाडला रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांचे व्यापक अभियान

मनमाड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावती रेल्वेगाडी साखळी ओढून थांबविण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे रेल्वे संचलन बिघडते, शिवाय साखळी ओढणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवाशांचा खोळंबा होतो. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी उचित कारण असल्याशिवाय धावत्या गाडीची साखळी ओढू नये यासह विविध प्रवासीकेंद्रित विषयांवर मनमाड रेल्वेस्थानकातील रेल्वे सुरक्षा दलातर्फे जनजागृती अभियान राबविले जात आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेसुबचे प्रभारी अधिकारी बेनीप्रसाद मीना यांनी दिली. यावेळी मनमाड लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, रेल्वेचे परिवहन निरीक्षक एस. व्ही. सुरवाडे, रेल्वेस्थानकांतील मुख्य तिकीट पर्यवेक्षक एस. एन. राम आदी उपस्थित होते. रेसुबचे मीना यांनी संयुक्त जनजागृती अभियानाचा उद्देश विशद केला. रेल्वेचे मंडल सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, सहायक आयुक्त डी. पी. कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या नेतृत्वात लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त जनजागृती अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत रेल्वेच्या विविध विभागांशी समन्वय साधून रेल्वे प्रवाशांना आवश्यक ती मदत आणि त्यांच्यात जनजागृती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. मनमाड रेसुबतर्फे १ जानेवारी ते ११ जून या कालावधीत कोणत्याही उचित कारणाशिवाय धावती गाडी चेन पुलिंग करून थांबविणाऱ्या २८४ प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या २० प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १०,७५० रुपयांचा दंड वसूल केला. रेल्वे लोहमार्ग ओलांडणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडतात. अशी कृती करताना १६८ लोकांना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ पकडले आणि त्यांच्याकडून १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशन आणि धावत्या गाडीमध्ये अनधिकृत पद्धतीने खाद्यपदार्थ विकणाऱ्या ९९७ लोकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख ९९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला. लोहमार्गावर असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेट नियमबाह्य पद्धतीने ओलांडणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरांतील नियोजित पार्किंगऐवजी अन्यत्र ठिकाणी वाहन पार्क केलेल्या ७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसर अस्वच्छ करणाऱ्या आणि स्थानकांत धूम्रपान करणाऱ्या ५५ लोकांना रेसुब कर्मचाऱ्यांनी थेट पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

बोगीच्या दरवाजातून पडून ६४ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू ^रेल्वे प्रवास करताना रेल्वे बोगीच्या दरवाजात बसणे धोकादायक आहे, अशा वारंवार सूचना देऊनही दरवाजात बसून अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अपघातासारख्या घटना वारंवार घडतात. जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत एकूण ६४ रेल्वे प्रवाशांचा अशाप्रकारे प्रवास करताना गाडीतून पडून मृत्यू झाला. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. - बेनीप्रसाद मीना, प्रभारी अधिकारी, रेसुब

रेल्वे प्रवासात ही घ्या दक्षता रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक ती दक्षता घ्यावी. रेल्वेचे अधिकृत तिकीट काढून प्रवास करावा. योग्य कारण असल्याशिवाय धावत्या रेल्वेगाडीची साखळी ओढू नये. लोहमार्ग ओलांडू नये, कोणत्याही अनधिकृत वेंडर्सकडून खाद्यपदार्थ खरेदी करू नये, लोहमार्गावर असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेटवर सिग्नल यंत्रणेचा वापर करावा. या गेटवर रेल्वेगाडी पास झाल्यानंतर आणि गेट पूर्णपणे उघडल्यानंतर आपली वाहने काढावी, रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करू नये, रेल्वे स्टेशनमध्ये निर्धारित पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करावे, प्रामुख्याने धावत्या गाडीची चेन ओढण्याच्या प्रकारावर व्यापक जनजागृतीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...