आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे होते. व्यासपीठावर संस्थेच्या महिला संचालिका शालन सोनवणे उपस्थित होत्या.
डॉ. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी मविप्र समाज नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे, एनएसएस, एनसीसी, खेळ आदी क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी या उद्देशाने सत्कार समारंभाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयातील भरत जाधव, अमोल शिरसाठ, भूषण जाधव, पुरुषोत्तम साचले, तेजस धोंडगे, मंगेश गलांडे, महेंद्र जाधव, तुषार बच्छाव, अविनाश सोनवणे, हर्षल मोरे, मयूर जाधव, पुष्पक साबळे या बारा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाली. तर छगन चौरे या विद्यार्थ्याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर अधिकारीपदी निवड झाली. सायली अहिरे, मंजूषा शेवाळे, कल्याणी यशवंते या विद्यार्थिनींनी आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयपातळीवर बॉक्सिंग क्रीडाप्रकारात यश संपादन केले. मनोज देवरे या विद्यार्थ्याने राष्ट्रीयपातळीवर झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक एनसीसीचे प्रा. तुषार खैरनार, क्रीडा संचालक प्रा. अमोल तिसगे यांचाही सन्मान करण्यात आला.
महिला संचालिका शालन सोनवणे यांनी इतर विद्यार्थ्यांनीदेखील यशवंत विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. डॉ. सुनील सौंदाणकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. डी. वसाईत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एस. पी. कांबळे, प्रा. पी. डी. सागर, प्रा.अमित निकम यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.