आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरात विविध ठिकाणी जातीय तणावाच्या घटना घडल्या असताना मालेगावात हिंदू व मुस्लिमांची एकता दिसून आली. चैत्राेत्सवानिमित्ताने पायी गडावर जाणाऱ्या भाविकांना पवित्र रमजानचे राेजेदार असलेल्या मुस्लिम बांधवांनी पाणी, सरबत वाटप केले. शनिवारी रात्री शहरात आलेल्या शिरपूरच्या मानाच्या देवी रथयात्रेवर मुस्लिम संघटनांनी पुष्पवृष्टी करून ऐक्याचा संदेश दिला.
खान्देशातील भाविक माेठ्या संख्येने पायी सप्तशृंगी गडावर पाेहाेचत आहेत. शहरातील मुस्लिमबहुल जुना आग्रा राेडने भाविकांचे जत्थे रवाना हाेत आहेत. यादरम्यान विविध मुस्लिम सामाजिक संघटना भाविकांना नाश्ता, पाणी व सरबतचे वाटप करत आहेत. काेविडचा अपवाद साेडला तर दरवर्षी मुस्लिम समाजाकडून देविभक्तांची सेवा केली जाते. गेल्या आठवड्यात राज्यातील काही शहरांमध्ये जातीय हिंसाचार घडला आहे.
मात्र, शहरवासीयांनी तणावाची परिस्थिती झुगारून लावत देविभक्तांचे जल्लाेषात स्वागत केले आहे. शिरपूर येथील मानाच्या देवी रथाचे आगमन हाेताच जुना आग्रा राेड भागात कूल जमाती तंजिमच्या पदाधिकाऱ्यांनी रथावर पुष्पवृष्टी केली. आग्रा राेडचे काम सुरू असल्याने मुस्लिम तरुणांनी रथासाठी रस्ता माेकळा करून देण्यासाठी सहकार्य केले. अतहर हुसैन अश्रफी, डाॅ. इक्बाल आदींनी देविभक्तांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहायक पाेलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांच्यासह हजाराे भाविक उपस्थित हाेते.
दर्शनासाठी ताेबा गर्दी मानाच्या देवी रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची ताेबा गर्दी झाली हाेती. चाळीसगाव फाट्यावर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जाेरदार स्वागत केले. रथ माेसम पूल चाैकात पाेहाेचताच जयघाेष करण्यात आला. रथाच्या स्वागतासाठी काही राजकीय पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली. पालकमंत्री भुसे समर्थकांनी क्रेनच्या साहाय्याने रथाला भव्य पुष्पहार अर्पण केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.