आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज हस्तगत:सिन्नरला गावठी कट्टा; काडतुसे विक्री करणारे दोघे गजाआड

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत गुलमोहर हॉटेलसमोर पुलाखाली मंगळवारी (दि.१) रात्री ८ वाजेच्या सुमारास वैजापूर येथून गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन मोबाइल, एक दुचाकी, एक पावती असा एकूण १ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतिफ रफिक शेख (२३), रा. रोहिदास चौक, इंदिरानगर ता- वैजापूर व आयाज अहमद शेख (२३) रा. खंडोबा नगर, बेळगाव रोड, ता.वैजापूर या दोघांंना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन मुसळगाव एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी (दि.२) दोघा संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मुसळगाव एमआयडीसी परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रवींद्र वानखेडे, विनोद टिळे, नवनाथ सानप, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात हॉटेल गुलमोहर समोर सापळा रचला. रात्री ८ वाजेच्या दरम्यान दोन तरुण सिन्नरहून शिर्डीकडे काळ्या लाल रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीवर जात असताना पोलिसांना संशयास्पद आढळून आले.

त्यांना थांबवून चौकशी करत झाडाझडती घेतली असता आतिफ रफिक शेख याच्या कमरेला असलेला दहा हजार रुपये किमतीचा चंदेरी रंगाचा १५ सेमी लांब व ११ सेमी. रुंदी असलेला गावठी कट्टा (पिस्तूल), व आयाज अहमद शेख याच्या खिशात असलेले जिवंत काडतूस व त्यांच्याकडील दोन मोबाइल, एक दुचाकी, एक पावती असा एकूण १ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघा संशयितांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...