आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:सिन्नर तालुक्यातील 575 अतिक्रमणधारकांवर पडणार हातोडा

सिन्नर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने सिन्नर नगरपरिषद हद्दितील गायरान व शासकीय जागेवरील सुमारे ४११ तर ग्रामीण भागातील १६४ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजविल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सिन्नर नगरपरिषदेने शहरात तर सिन्नर पंचायत समितीने तालुक्यातील शहा, दातली आणि गोंदे या तीन गावांतील १६४ जणांना अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र बजावले आहे.

त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. नगरपालिकेने १४ तारखेला पाठवलेल्या नोटीसीत १० दिवसांच्या आत अतिक्रमण काढून न घेतल्यास नगर परिषद अतिक्रमण काढणार असून त्यावर होणार खर्च संबंधितांकडून वसूल करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. शहर व परिसरात शासनाच्या नावे दाखल असलेल्या जमिनीवर अनेक नागरिक वर्षानुवर्षांपासून राहत आहे.

शासनाकडे विहीत असलेल्या कोणत्याही जमिनीचा अनिधकृतपणे भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस निष्कासित करण्याची तरतूद कायद्यात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेच यासंदर्भाने आदेश पारित केलेले असल्याने राज्यभरात अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई होणार आहे.

दरम्यान, गायरान व शासकीय जमिनीवरील काही अतिक्रमणे डोळ्यांनी दिसून येतात. मात्र, त्यांची अद्यापही महसूल अथवा ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही. अनेक गावांत अशा अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीने वीज, नळ व रस्ते या सुविधा उपलब्ध करून देऊन एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. अशा अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यासाठी महसूल यंत्रणेला सर्वेक्षण करावे लागेल.

महापुरात शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेला
सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात सरस्वती नदीला महापूर आला होता. त्यात नदीलगतची घरे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर विविध पक्षांची नेतेमंडळी, मंत्री, आमदार, खासदार यांनी नुकसानीची पाहणी केली.

तथापि, काही आपत्तीग्रस्तांनी मंत्र्यांशी उलटसूलट बोलणे केल्यानेच ही कारवाई होत असल्याचा गैरसमज नदीलगतच्या काही रहिवाशांमध्ये झाला आहे. शहर परिसरातील मोफत नगर, खळवाडी, एकता नगर, अपना गॅरेज झोपडपट्टी, आंबेडकरनगर भागात शासकीय जागेवर अनिधकृतपणे कब्जा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरस्वती नदी लगतची काही घरे ही अतिकमणात येत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शहा, गोंदे व दातली येथे १६४ अतिक्रमणे
सिन्नरच्या ग्रामीण भागात गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत नोटीसा बजविण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली. त्यात शहा येथे ९३, गोंदे येथे २८ तर दातली येथील ४३ अतिक्रमण धारकांचा समावेश आहे.

निर्णयाचा विपर्यास
२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमनाकुल करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन देताच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली. मुळात २०११ पूर्वी ज्यांना घरकुल मिळाले आहे व ते अतिक्रमित जागेत असेल तर अशी घरकुले नियमानुकूल करण्याच्या निर्णयाबाबत हे आश्वासन होते, मात्र त्याचा विपर्यास झाल्याने अतिक्रमणे वाढली.

बातम्या आणखी आहेत...