आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहादविरोधात मोर्चा:नराधमाला फाशी द्या ; लासलगावला माेर्चात हिंदू संघटनांचा सहभाग

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा, श्रद्धा वालकरची हत्या करणारा संशयित आफताब पूनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कठोर कारवाई करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी येथील विविध हिंदू संघटनांच्या वतीने महंत जनेश्वर महाराज (भारतमाता आश्रम बोकडदरे), निशा पाटील-भिरुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मागण्यांचे निवेदन लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, बाबा अमरनाथ सोशल ग्रुप, सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील बाबा अमरनाथ मंदिर, एस. टी. अागार येथून सकाळी अकरा वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी विविध राजकीय पक्ष, संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

महिला व युवतींचा लक्षणीय सहभाग मोर्चात महिला व युवतींचा लक्षणीय संख्येने सहभाग होता. विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीतानंतर या मोर्चाचा समारोप करण्यात आला. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

त्र्यंबकेश्वर येथे हिंदुत्ववादी संघटनेचा विराट मोर्चा शहरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विराट मोर्चातून काढण्यात आला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तालुका व शहरातील सर्व हिंदूप्रेमी नागरिकांनी प्रार्थना केली. यावेळी आनंद आखाड्याचे महंत शंकर सरस्वती, रघुनाथ महाराज ऊर्फ फरशीवाले महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेश गंगापुत्र, भूषण अडसरे, वारुंगसे बंधु यांच्यासह येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह शहरातील युवती, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सिन्नरला मंगळवारी मोर्चा सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी (दि. ६) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. लव्ह जिहादच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बसस्थानकाजवळील महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात होईल. नेहरू चौकमार्गे नवा पूल, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस, सिन्नर तहसील कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...