आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे त्वरित पूर्ण:येवला तालुक्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करा

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येवला मतदारसंघातील जलसंधारण प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जलसंधारणाच्या कामाबाबत शनिवारी माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत भुजबळ फार्म, नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी राजेंद्र काळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी शेख, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, प्रियंका भडके, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी मतदारसंघातील कोटा बंधारा महालखेडा, सावरगाव, ममदापूर (मेळाचा बंधारा) व देवना साठवण तलाव, प्रस्तावित राजापूर (वडपाटी) व जायदरे (वडपाटी) साठवण तलावांसह बंधारे दुरुस्ती व प्रस्तावित दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. महालखेडा बंधाऱ्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबरपूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

निफाड तालुक्यातील सावरगाव साठवण तलावासाठी ११ कोटी ८० लाख रुपये निधी प्राप्त असून या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सहा महिन्यांत या प्रकल्पासाठी पुन्हा सुप्रमा घेऊन डिसेंबर २०२३ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सदरच्या कामात दिरंगाई न होता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ममदापूर साठवण तलावासाठी सहा कोटी ४५ लाख रुपये निधी प्राप्त असून वनविभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागपूर कार्यालयात दाखल केलेला आहे. या प्रकल्पाच्या फेज वनला महिनाभरात मंजुरी मिळून प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. तसेच देवना साठवण तलावाची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदेस परवानगी देण्याबाबत जलसंधारण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत निविदा मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.

तालुक्यातील प्रस्तावित राजापूर-वडपाटी व जायदरे साठवण तलावाच्या पाणी उपलब्धता प्रस्तावातील त्रुटी दुरुस्ती करून प्रस्ताव आठवडाभरात जलसंपदा विभागाकडे दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव आठवडाभरात शासनाला सादर करावे, अशा सूचना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...