आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण असताना मुस्लिमबहुल मालेगाव शहरात शांतता दिसून आली. हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्तीच्या मशिदींमधून पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तर बहुतांश मशिदींमध्ये लाउडस्पीकरवर अजान झाली. मात्र, त्याला प्रतिक्रिया म्हणून बुधवारी दिवसभरात कुठल्याही मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न झाला नाही. पोलिसांनी शहरातील मशिदींच्या परिसरात सशस्त्र बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे व माउली बच्छाव यांचा हद्दपारी प्रस्ताव सादर करून सात कार्यकर्त्यांना नोटिसा बजावून ताकीद देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या अल्टिमेटममुळे पोलिसांनी शहरात विशेष खबरदारी घेतली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील मालेगावी तळ ठोकून होते. त्यांनी पहाटेच्या अजान दरम्यान, कुसुंबाराेड, संगमेश्वर, कॅम्प, गूळ बाजार भागातील मशिदींना भेटी दिल्या. मुख्य जामा मशिदीसह संमिश्र ठिकाणच्या मशिदींमध्ये पहाटे विना भोंगा अजान देण्यात आली. मात्र, इतर चार वेळची अजान डेसिबल मर्यादा पाळून दिली गेली.
पोलिसांनी मनसैनिक लाउडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची शक्यता लक्षात घेऊन अध्यक्ष राकेश भामरे व इतर सात कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. भामरे व बच्छाव यांना कलम १४४ अन्वये १४ दिवसांसाठी हद्दपार करावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पाठविलेल्या या प्रस्तावांवर प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. भोंगे वादाची संधी साधून काही समाजकंटक शांतता भंग करू नये म्हणून त्यांच्यावरही पोलिस लक्ष ठेवून होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.