आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्ल्युसिव्ह:14 तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ; पावसाच्या माहेरघरी मात्र घट

भरत घोटेकर | सिन्नर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांचा पावसाळा ऋतू यंदा तब्बल महिनाभर लांबला. जिल्ह्यात यंदा वरुणराजा सरासरीपेक्षा अधिक बरसल्याने सर्वच जलस्रोत ओतप्रोत भरले. परिणामी नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातच टंचाईची चाहूल लागणाऱ्या अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये यंदा मात्र उशिरापर्यंत किंबहुना पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी टिकण्याची शक्यता आहे. याशिवाय शासनाचा टँकरच्या पाणीपुरवठ्यावरील खर्चातही कपात होणार आहे. तर दुसरीकडे पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात मात्र भूजल पातळीत ०.७३ मीटरची घट झाली आहे.

सतत भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे चित्र असताना यंदा मात्र वरुणराजा जोरदार बरसल्याने सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले. त्यामुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. भूजल सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. भूजल सर्वेक्षण विभाग दरवर्षी चारवेळा सर्वेक्षण करून भूजल पातळी मोजताे. या विभागाकडून जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर आकडेवारी राज्य पातळीवर दिली जाते. सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो; पण यंदा ऑक्टोबरअखेरीस पाऊस सुरू होता.

यावेळी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बागलाण तालुक्यातील (१८), चांदवड (६), देवळा (७), दिंडोरी (१०), इगतपुरी (१०), कळवण (६), मालेगाव (२२), नांदगाव (२३), नाशिक (९), निफाड (२०), पेठ (४), सिन्नर (१८), सुरगाणा (७), त्र्यंबकेश्वर (१२) आणि येवला (१३) अशा एकूण १८५ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीबरोबर ऑक्टोबरअखेरच्या भूजल पातळीची तुलना करून यातील घट व वाढ काढण्यात आली. भूजल पातळीत सर्वाधिक वाढ १.४३ मीटर बागलाण तालुक्यात तर सर्वांत कमी निफाड तालुक्यात ०.२० मीटरने पाणीपातळी वाढली.

अशी झाली पाणीपातळीत वाढ
बागलाण तालुक्यात सर्वाधिक (१.४३), चांदवड (१.४१), देवळा (१.२२), दिंडोरी (०.८१), कळवण (१.०९), मालेगाव (१.२३), नांदगाव (१.३४), नाशिक (०.९९), निफाड (०.२०), पेठ (०.७५), सिन्नर (०.९७), सुरगाणा (०.२५), त्रंबकेश्वर (०.६२) आणि येवला तालुक्यात (१.२८) मीटर इतकी सरासरी भूजल पातळी वाढली आहे. तर इगतपुरी तालुक्यातील भूजल पातळीत ०.७३ मीटरची घट झाली आहे.

१८५ विहिरींचे निरीक्षण
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील १८५ विहिरींचे निरीक्षण केले आहे. त्यांची पातळी घेतल्यानंतर ती सर्व एकत्रित केली. त्यावरून भूजल पातळी निश्चित केली. जिल्ह्यातील इगतपुरी वगळता सर्व तालुक्यांत अर्धा ते एक मीटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. - जे. एस. बेडवाल, कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण

बातम्या आणखी आहेत...