आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथरे बुद्रुक येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या निकृष्ट कामांची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली. शुक्रवारी (दि. १७) दुपारी सुमारे अडीच तास केलेल्या पाहणीत ‘Z’ आकाराची जलवाहिनी, जलकुंभाखाली बसवलेला वीजपंप आणि उघड्यावर असलेल्या जलवाहिन्या पाहून अधिकारीही अवाक् झाले. या पाहणीचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांना सादर केला जाणार आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाथरे बुद्रुक येथे राबविण्यात आलेल्या या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून त्यासंदर्भात ग्रामपंचायतीने तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. या संदर्भातील वृत्त गुरुवारी (दि. १६) ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाले होते. योजनेतील निकृष्ट कामाचे वास्तव समोर आणले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियांत्रिकीतज्ज्ञ पी. टी. बडगुजर, अभियांत्रिकी समन्वयक मोहन सराफ, शाखा अभियंता ए. बी. पाटील, शिंदे आदींनी शुक्रवारी पाथरे बुद्रुकच्या सरपंच सुजाता भाऊसाहेब नरोडे, ग्रामसेवक गोविंद मोरे यांच्यासह सदस्यांना सोबत घेत सुमारे दोन ते अडीच तास या योजनेच्या कामाची पाहणी केली. कोळगावमाळ शिवारातील उद्भव विहिरीवर बसवलेल्या वीजपंपाला अद्याप जलवाहिनीची जोडणी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीच्या भूमिगत गटारी झालेल्या ठिकाणावर किमान फूटभर खोलीवर जीआय पाइप गाडणे शक्य असतानाही ते वरचेवर टाकून खोदकाम करण्यात हातचलाखी दाखविण्यात आल्याचे व त्यावर टाकलेले काँक्रीटही निकृष्ट असल्याचे दिसून आले. चेंबरच्या कामांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
ठेकेदाराची दांडी
यशवंत कांदळकर या एजन्सीच्या नावावर हे काम घेण्यात आले आहे. अधिकारी या कामाची पाहणी करण्यासाठी येणार हे अवगत असूनही एजन्सीचे मालक बाहेरगावी असल्याचे कारण सांगून या कामाकडे फिरकले नाहीत. दुसरीकडे उपठेकेदार मात्र दोन ते अडीच तास अधिकाऱ्यांबरोबर थांबून होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.