आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

मालेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी व दहिकुटे धरणांच्या बंदिस्त कालवे कामाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पुकारलेले धरणे आंदाेलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच हाेते. कुणीही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. भर थंडीत आंदाेलनस्थळी जेवणाची व्यवस्था करत शेकाेट्या पेटवून शेतकरी आपल्या कुटुंबियांसह ठिय्या देऊन बसले आहेत.

कालवे बंदिस्त न करता पाटचारीद्वारे पारंपरिक पद्धतीने पाण्याचे वितरण व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सदर पाटचारीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात बंद हाेते. जमिनीत मुरलेल्या पाण्यावर पुढील तीन महिने काढावे लागतात. खडकाळ जमिनी असल्याने सध्या पिकांना दुसऱ्याच दिवशी पाणी द्यावे लागते. कालवे बंदिस्त केले तर शेत पिकांना पाणी मिळणारच नाही. त्यामुळे आत्महत्या हा एकच पर्याय शिल्लक असल्याचे आंदाेलनात सहभागी महिलांनी सांगितले. अंबेदरी लघुपाटबंधारे प्रकल्प वनविभागाच्या हद्दीत आहे.

या प्रकल्पाची उंची वाढवून खाेलीकरण केले तर अनेक गावांना पाणीपुरवठा करता येईल. पालकमंत्र्यांनी कालवे बंदिस्त करण्याऐवजी पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. साेमवारी महसूल व पाेलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली हाेती. यानंतर पाटबंधारे विभागासह इतर कुणीही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी फिरकले नाहीत. आम्ही मागणीवर ठाम असून शेवटपर्यंत लढा देण्याची भूमिका शेतकरी भूषण कचवे व शरद शिंदे यांनी व्यक्त केली.

शेकाेट्या पेटवून ठिय्या
थंडीचा कडाका जाणवत आहे. शेतकऱ्यांचे आंदाेलन उघड्यावर सुरू असल्याने आंदाेलकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी शेकाेट्या पेटवून आंदाेलनस्थळी तळ ठाेकून आहेत. आंदाेलनात सहभागी सर्वांसाठी जेवण तयार केले जात आहे. आंदाेलनाच्या ठिकाणी पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...