आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिराधारांना आधार देण्यासाठी शासनाने राबविलेल्या श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजनेच्या लाभार्थींना गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारकडून अनुदानच न मिळाल्याने लाभार्थींची परवड सुरू आहे. अनुदान न मिळाल्याने जगायचे कसे?, पोटाची खळगी कशी भरायची? असे यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभे आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेंतर्गत निराधार, दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा एक हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यांना मुले, पती, पत्नी, नातेवाइक व इतर कोणाचाही आधार नाही अशा निराधारांचा या योजनेत समावेश आहे. शासनाच्या आर्थिक मदतीवरच कसेबसे हे निराधार दिवस पुढे ढकलत आहेत.
त्यात गगनाला भिडलेली महागाई, त्यामुळेच या निराधारांना त्वरित अनुदान देण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून होत आहे. परंतु, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण दाेन लाख १९,७०७ निराधार लाभार्थी आहेत. यातील राज्यस्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचे अनुदानही तीन महिन्यांपासून रखडले होते, मात्र ते नुकतेच प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाची अद्यापही प्रतीक्षाच आहे. केंद्राकडे ३३ कोटी ११ लाख २५ हजार ८७० रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना
अनुसूचित जाती : ४७१०
अनुसूचित जमाती : ८५४६ सर्वसाधारण : २६२१५
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना : अनुसूचित जाती : १०१०३
अनुसूचित जमाती : ३०६८१
सर्वसाधारण : ६६२५१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना : ६४,७७३
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना : ६९९५
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग वेतन योजना : ६५९
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना : ७७४
एकूण लाभार्थी संख्या : २,१९,७०७
राज्याचे अनुदान प्राप्त, केंद्राचे प्रलंबित
निराधारांसाठी राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचे वितरण सुरू आहे. केंद्र सरकारचे मात्र तीन महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. नॅशनल सोशल असिस्टन्स पोर्टलद्वारे थेट लाभार्थींच्या खात्यावर अनुदान वितरणाची प्रक्रिया केंद्र सरकारने हाती घेतली आहे. त्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. - रचना पवार, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना
शासनाकडून निराधारांची थट्टा
महागाईत जगावे की मरावे तेच कळेनासे झाले आहे. घरात कुठलीही वस्तू आणायची म्हटल्यावर पैसा हवा. मात्र तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. खिशात पैसे नसल्याने चणचण जाणवत आहे. शासनाने निराधारांची थट्टा चालवली आहे. - भाऊराव खरात, लाभार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.