आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामरीमाता चौक ते झांजेश्वर अमरधाम रस्त्याची दुर्दशा झाली आहे. निव्वळ आश्वासन देत महापालिका प्रशासन जनतेची फसवणूक करत आहे. मनपाच्या फसवेगिरीचा निषेध करत जनाधिकार रक्षा मंचच्या सदस्यांनी शुक्रवारी दुपारी साचलेल्या गटारीच्या पाण्यात एप्रिल फूल प्रतिकृतीचे रोपण करत कागदी होड्या सोडून घोषणाबाजी केली. प्रभाग क्रमांक ४ चे बीट मुकादम अजय चांगरे यांना निवेदन देत महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली.
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावर तुंबलेले आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या गटारीच्या पाण्यातून व खड्ड्यांमधून वाट काढावी लागते. या त्रासाला कंटाळून नागरिक झांजेश्वर अमरधामऐवजी श्रीरामनगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करत आहेत. २०२० पासून रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे. मनपा प्रशासनाला जाग येत नसल्याने गटारीच्या पाण्यात होड्या सोडून निषेध नोंदविण्यात आला.
मनपाचा कारभार जनतेसाठी एप्रिल फूल सारखा असल्याने कागदी एप्रिल फूलच्या प्रतिकृती तयार करुन त्यांचे गटारीच्या चिखलात रोपण करण्यात आले. ‘मनपाने फुलविले अजब फूल, जनतेला करते एप्रिल फूल’, ‘महाबजेटचा गजब खेळ, रस्ता, गटार कामात फेल’ अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा मनपासमोर चक्री आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी रक्षा मंचचे अध्यक्ष नेविलकुमार तिवारी, गजानन येवले, आशिष पोरवाल, खुशाल पाटील, पवन दुसाने, यशवंत पहिलवान, अनिल महाले, सुफी जमील टेलर, मुफ्ती वासिफ, हाफिज मोहम्मद यासीन, मोहम्मद मुर्तुजा हसन, वसीम अहमद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.