आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेह (जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या आगासखिंड येथील सैन्यदलातील जवान खंडू भागूजी बरकले (५१) यांच्यावर रविवारी (दि. १२) दुपारी शासकीय इतमामात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबासोबतच उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. ‘शहीद जवान खंडू भाऊ अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. रविवारी सैन्यदलाचे सोपस्कार पूर्ण करून चंदिगडवरून बरकले यांचे पार्थिव विमानाने मुंबईला आणण्यात आले.
तेथून रुग्णवाहिकेतून गावाकडे आणले गेले. बेलू फाटा येथे फुलांनी सजवलेल्या व ‘शहीद जवान खंडू बरकले अमर रहे’ असे फ्लेक्स लावलेल्या लष्कराच्या गाडीतून हे पार्थिव आगासखिंड गावात आणले गेले. रस्त्याच्या दुतर्फा सडा, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
‘आम्ही जातो तुमची कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी’ हा तुकाराम महाराजांचा वैकुंठगमनाचा अभंग त्याचप्रमाणे टाळ व मृदंगाच्या गजरात येथील भजनी मंडळांनी पार्थिवाचा सन्मान केला. अमर जवान खंडू बरकले यांचे पार्थिव घराजवळ पोहोचताच वीरपत्नी योगिता बरकले, भाऊ रावसाहेब बरकले, नंदू बरकले, दामू बरकले यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, मुलगी रितू यांनी शवपेटीला कवटाळत हंबरडा फोडला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आगासखिंड येथील शरदचंद्रजी पवार ग्रामसंस्कार केंद्राच्या मोकळ्या पटांगणात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलाचे लेफ्टनंट कर्नल सतीश मिश्रा, सुभेदार आर. के. पाठक, हवालदार विनोद पंडित, नायक साहिल वर्मा, पप्पू शेखावत, लान्सनायक सूरज सताळे, केशव, सतीश कुमार, अजय कुमार, यमनकुमार , रघुनाथ तुपे आदींनी सशस्त्र सलामी दिली. आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी बरकले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.