आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपुष्टात:कडवाच्या पूरपाण्याचे आवर्तन; 10 गावांची टंचाई येणार संपुष्टात

सिन्नर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडवाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान कमी असल्याने कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. दरम्यान, सिंचनाची मागणी झाल्यास त्यासाठीही पूरपाणी उपलब्ध करून देण्याचा मानस पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. कडवा धरण ओव्हरफ्लो झाल्यापासून कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. १६ जुलैला आवर्तन सोडल्यानंतर आठव्या दिवशी पूरपाणी शेवटच्या ८८ किलोमीटरवरील पुतळेवाडी येथे शनिवारी (दि. २३) पोहोचले. पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचा जास्तीत जास्त लाभ देण्याचे प्राधान्य आहे.

धरण क्षेत्रात ६५० मिमी पाऊस
कडवा धरण व पाणलाेट क्षेत्रात आत्तापर्यंत ६५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत सातशे मिलिमीटर पाऊस झाला होता. तुलनेत यंदा गतवर्षापेक्षा जवळपास ९० दिवस अगोदरच जास्त पाऊस झाला. त्यामुळे पूरपाण्याचा लाभ यंदा लवकर मिळाला आहे. गतवर्षी १३ सप्टेंबरला पूरपाणी सोडण्यात आले होते. मात्र, शेवटच्या टाेकाला पाणी जाण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत वेळ लागला होता. तुलनेने यंदा दोन महिने अगोदरच पूरपाणी सोडण्यात आले आहे तर आठव्याच दिवशी ते शेवटच्या टोकाला पोहोचले आहे.

पाणी याेजनांचे साठवण तलाव भरणार
वडांगळीसह सात गावे योजनेचा साठवण तलाव भरण्यासह पंचाळे शिवारातील डांबर नाला तलावही भरण्यात येणार आहे. त्यामुळे पांगरी पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू होऊ शकेल. पुतळेवाडी, कोमलवाडी येथील स्थानिक नळ पाणीपुरवठा योजनांकरिता सार्वजनिक विहिरीजवळचे तलाव भरण्यात येणार आहेत.

वंचित क्षेत्राची तहान पूर्ण हाेण्यास मदत
कडवा प्रशासनाने तहानलेल्या लाभक्षेत्राला अडचणींवर मात करून पूरपाणी देऊन भूक-तहान पूर्ण केली. पूरपाण्यासाठी प्रशासकीय नियमांची अडचण येते. पूरपाणी नियमांच्या जाचातून कडवा प्रकल्प मुक्त करून हळूहळू आम्हा लाभधारकांना पुढील पिढीसाठी हा प्रश्न कायमचा मिटवायचा आहे. त्यातून ‘कडवा’साठी ‘वाघाड पॅटर्न’ही आम्ही राबवू शकतो. अर्थात या दोन्हीही टास्कच्या अवघडतेची कल्पनाही आम्हाला आहेच. पण, आमची तत्परता व शासनाचे सहकार्य यातून कडवा प्रकल्पाचे स्वरूपच बदलण्याची इच्छा आहे. २०२१ प्रमाणे २०२२ ला मागे न राहता पुन्हा १०० टक्के कडवा पाणी मागणी अर्ज भरणारच आहोत.

बातम्या आणखी आहेत...