आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:करंजवण पाणी योजना टेंडरला मुहूर्त, दाेन वर्षांत मनमाडकरांना राेज पाणी

मनमाड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३०५ कोटी रूपये खर्चाच्या हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे टेंडर अखेर मंजूर करण्यात आले आहे. ते उल्हासनगरच्या ईगल कंपनीला देण्यात आले आहे. योजना पूर्ण करण्याची मुदत दोन वर्ष असली तरी ती केवळ पुढील अठरा महिन्यांतच पूर्ण केली जाईल, असे आश्‍वासन कंपनीने नगरपालिकेला दिले असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. करंजवण धरण ते वागदर्डी धरण अशी ७२ किमीची ही भूमिगत ३६ इंची व्यासाची जलवाहिणी आहे. यामुळे नेहमी टंचाई सहन करणाऱ्या मनमाडकरांना दाेन वर्षात राेज पाणी मिळेल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

तीन महिन्यांपासून अनेकदा फेरटेंडर काढूनही या योजनेची निविदा भरण्यास कंत्राटदार पुढे येत नव्हते. राज्य शासनाकडून या योजनेसाठीचा प्राथमिक हप्ताही नगरपालिकेकडे जमा झालेला आहे. सदर कंत्राटदाराने या योजनेसाठीच्या २०० कोटी रुपये पाइप खरेदीची ऑर्डरही दिलेली असल्याची माहिती आमदार कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेसाठी तीन महिन्यांत अनेक कंत्राटदार पुढे आले होते. परंतु योग्य त्या पात्रतेच्या कंत्राटदाराची तपासणी सुरू होती. अखेर अनुभवाचा निकष लावून काटेकोर तपासणीअंती या स्वरूपाच्या कामाचा दीर्घकालीन अनुभव असलेली व सुमारे १० हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या ईगल कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. दि. १४ नोव्हेंबरला या योजनेची नगरपालिकेने दिलेली वर्कऑर्डर कार्यान्वित होईल. योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते पुढील महिन्यात होईल. त्यानंतर १८ महिन्यांतच ही योजना पूर्ण होईल.

नगरपालिकेची सध्याची एकात्मता चौकातील इमारत ही अत्यंत जुनी झाली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे नवीन बिल्डिंग बांधण्यासाठीही वेगळा निधी मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे नूतन तालुकाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शहराध्यक्ष मयूर बोरसे, जिल्हा युवा अधिकारी फरहान खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका संघटक महावीर ललवाणी, समन्वयक बाळा सांगळे, उपजिल्हा युवा अधिकारी नितीन सानप, तालुका युवा अधिकारी सागर हिरे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, समन्वयक सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ, अपंग सेना शहराध्यक्ष विठ्ठल नलावडे, महिला आघाडी शहरप्रमुख संगीता बागूल, नीलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

..अशी आहे पाणी योजना
करंजवण धरणापासून मनमाडपर्यंत जलवाहिणी, जलशुध्दीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन व त्यासंबंधित उपांगांसह प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम २७३ कोटी, ४१ लाख, आठ हजार रुपये (जीएसटी वगळता) आहे. या प्रकल्पाला लोकवर्गणीपोटी नगरपरिषदेकडून १५ टक्के रक्कम भरावी लागणार होती, मात्र अमृत २.० योजनेत मनमाडचा समावेश झाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या खर्चाच्या १५ ऐवजी १० टक्के लोकवर्गणीची रक्कम पालिकेला भरावी लागणार आहे. पालिकेची आर्थिक कुवत नसल्याने ही रक्कमही शासनातर्फे नगरपालिकेला विशेष तरतूदीद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

फुले मार्केट व महर्षी वाल्मीकी स्टेडियम दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५ कोटी
सावित्रीबाई फुले मार्केटच व महर्षी वाल्मीकी स्टेडियमचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये तर पांझण-रामगुळणा संगमावरील नवीन पुलासाठी ५ कोटी रुपयांची रक्कम नगरपालिकेकडे आलेली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एमआयडीसीसाठी सध्याची जुनी पालखेड योजना हस्तांतरण
मनमाड एमआयडीसीसाठी सध्याची जुनी पालखेड योजना हस्तांतरण केली जाणार असल्याची माहितीही आमदार कांदे यांनी दिली. मनमाड एमआयडीसीची जागा निश्‍चित करून त्यासाठी या योजनेतील पाणी देण्यात येईल, त्यामुळे या मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्‍न मार्गी लागण्यासही मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...