आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाविराेधात घोषणाबाजी:किसान सभेचा बिऱ्हाड मोर्चा; तहसील कार्यालय परिसरात ठोकला मुक्काम

दिंडोरी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले, पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या, ऑनलाइन रेशनकार्ड करून लाभार्थ्यांना शिधा वाटप करा यासह इतर मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढत मुक्काम ठोकण्यात आला. त्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

माकपचे तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वटाणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देवीदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन करण्यात आले. बुधवारी सकाळी दहा वाजेपासूनच माकप, किसान सभेचे कार्यकर्ते महिलांसह आपले बिऱ्हाड व लहान मुले घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमण्यास सुरुवात झाली.

दुपारी २ वाजता बाजार समितीच्या पटांगणातून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात झाली. ३ वाजता मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकताच शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चेकऱ्यांना सुनील मालसुरे, किसन गुजर, रमेश चौधरी, लक्ष्मीबाई काळे, आप्पा वटाणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश भोये, श्रीराम पवार, दौलत भोये, रमेश चतुर, अभिमन्यू कडाळे आदींसह शेकडाे माकप किसान सभेचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

..या आहेत आंदाेलनकर्त्यांच्या मागण्या...
तालुक्यातील संपूर्ण गावांची पीक पाहणी करावी.
वृद्धापकाळ, विधवा महिला पेन्शन चालू करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा.
तालुक्याला जोडणारे नादुरुस्त रस्त्यांची त्वरित कामे चालू करा, रस्त्याचे कामे अपूर्ण ठेवलेल्या संबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करा.
दिंडोरी पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
पंधरा वर्षापासून जे कर्मचारी तालुक्यात कार्यरत आहे त्यांच्या बदल्या कराव्या.
वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, सर्व दावे मंजूर करून चार हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणाऱ्याचे नावे करून ७/१२ कसणाऱ्याच्या नावे कब्जेदार सदरी करावे.
तालुक्यातील एमआयडीसी व कारखान्यातील रोजगारात स्थानिक युवक-युवतींना ८० टक्के प्राधान्य द्यावे.

आज पुन्हा चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. परंतु त्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन चालू ठेवण्याचा पर्याय अवलंबला असला तरी आज पुन्हा त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या मागण्यांवर पुन्हा चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.- पंकज पवार, तहसीलदार

बातम्या आणखी आहेत...