आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे माेठे नुकसान:कोळगाव माळला साठवण तलाव फुटून 50 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली;रोजगार हमी योजनेतून बांधलेला बंधारा पहिल्यांदाच झाला होता ओव्हर फ्लो

सिन्नर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोळगाव माळ येथे रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आलेला साठवण तलाव (बंधारा) शनिवारी (दि.१०) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने फुटल्याने ५० हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली. ५० कुटुंबाच्या घराला पाण्याने वळसा घातला. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे.३५ ते ४० वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून हा बांधारा बांधण्यात आला आहे. यापूर्वी कधीही हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. मात्र, शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाला.

अचानक वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे शनिवारी रात्री बंधाऱ्याच्या मुख्य भरावाच्या मध्यभागी तडा जाऊन तो फुटल्यामुळे परिसरात माेठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची बंधाऱ्याखालील शेतीच वाहून गेली. ऊस, मका, सोयाबीन, फळबागा आदी पिकांचे माेठे नुकसान झाले. रविवारी पहाटे बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर धावपळ उडाली.

प्रकाश रुईकर, कैलास रुईकर यांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वामन चंद्रे, वसंत धोक्रट, रामनाथ मोरे, सुदाम गव्हाणे या शेतकऱ्यांच्या घराला पूर्णपणे पाण्याने वेढा घातल्याने माणसांसह जनावरांचे गावात सुरक्षीत स्थळी स्थलांतरित करण्यात आले. ५० कुटुंबीयांना त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी रस्ता करावा लागला. या घटनेनंतर रविवारी कोळगाव माळचे कामगार तलाठी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी करत नुकसानीचे पंचनामे सुरू केले.

तातडीने मदत करावी...
कोळगाव माळ परिसरात गेल्या ५० वर्षात असा पाऊस झाला नाही. या पावसामुळे ५० हेक्टर शेती पिकांबरोबरच ५० ते ६० शेतकरी कुटुंब पाण्याखाली गेले आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामा करून तातडीची मदत करण्यात यावी.
मुक्ताबाई चंद्रे, सरपंच, कोळगाव माळ.

बातम्या आणखी आहेत...