आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक उन्हाळ्यातही मुबलक पाणी ​​​​​​​:साडेआठ लाख खर्चून उभारला तलाव; 1.75 कोटी लिटरच्या साठवण तालावातून वाद-वराडी टंचाईमुक्त

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील वाद-वराडी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून साडेआठ लाख रुपये खर्च करून सुमारे पावणेदोन कोटी लिटर साठवण क्षमतेच्या कृत्रिम साठवण तलावाची निर्मिती केली आहे. या तलावामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात वापराच्या पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने गाव टँकरमुक्त झाले असून उन्हाळ्यात या गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी शासनाला दरवर्षी कराव्या लागणाऱ्या लाखाे रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे.

अवर्षणप्रवण क्षेत्र असलेल्या चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. वादवराडी गावाला उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने तालुक्यात सर्वप्रथम या गावाची उन्हाळ्यात डिसेंबरमध्येच टँकरने पाणीपुरवठ्यासाठी शासनदरबारी मागणी होत होती. परिसरात खडकाळ जमीन असल्याने नैसर्गीक स्त्रोत नाही व त्यातच गावासाठी असलेली नाग्यासाक्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेली. परिणामी उन्हाळ्यात विहिरी आटल्याने माेठी पाणीटंचाई भासत होती. हक्काचे व मुबलक पाणी
ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गरज विहिरी व हातपंपावरून भागत असून वापरासाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी पुरवूनही तलावात अद्यापही पाणी शिल्लक आहे. या तलावाला सुरक्षिततेसाठी जाळीचे कंपाउंंडही करण्यात आले आहे. साठवण तलावामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. साठवण तलाव उंचावर केल्याने ग्रामस्थांना ग्रॅव्हिटीने मुबलक पाणी मिळत आहे. यामुळे गावाची ‘कायमस्वरूपी दुष्काळी’ अशी असलेली ओळख पुसली जाणार आहे.

टँकरवर होणाऱ्या लाखोंच्या खर्चाची बचत
वादवराडी या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाला सुमारे १५ ते २० लाख रुपये खर्च येत होता. साठवण तलावातील प्लास्टिक कागदाची वयोमर्यादा सुमारे १० वर्षे असून पुढील दहा वर्षात शासनाच्या सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे. ही योजना पूर्व भागातील परिसरातील दरेगाव, निमोण या गावांनाही राबविण्याचे विचाराधीन आहे.
- महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

ग्रामस्थांना फिल्टर पाणी देण्याचे विचाराधीन
वादवराडी कायमस्वरूपी टंचाईग्रस्त गाव असल्याने उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठा कसा टिकून राहील या दृष्टीने नियोजन करण्यात आले. त्यासाठी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले व आलेल्या अडचणी दूर केल्याने हा प्रकल्प पूर्ण करू शकलो. भविष्यात ग्रामस्थांना फिल्टर पाणी देण्याबाबत नियोजन करणार आहोत. त्यातून ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल.
- भगवान खताळ, ग्रामपंचायत सदस्य

बातम्या आणखी आहेत...