आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिकेच्या १३ प्रभागातील २६ जागांसाठी सोमवारी आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रांताधिकारी ज्योती कावरे व पालिका मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अनुसूचित जातीच्या दोन, तर अनुसूचित जमातीच्या एक राखीव जागांसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर अनुसूचित जातीच्या दोन जागांपैकी एक जागा चिट्ठीद्वारे (सोडत) महिला आरक्षित करण्यात आली.
अनुसूचित जमातीची एक जागा असल्याने व मागील निवडणुकीत ही अनुसूचित जमातीची जागा महिला राखीव असल्याने यावेळेस नियमानुसार ती अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली. पालिकेच्या प्रभाग १-अ मध्ये अनुसूचित जातीसाठी, प्रभाग १३-अ मध्ये अनुसूचित जाती महिला, तर प्रभाग १२-अ मध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाल्याने या प्रभागातून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र दिसून आले.आरक्षण सोडतीसाठी नगररचनाकार कौस्तुभ भावे, रचना सहायक अमोल पाटील, राहुल पाटील, शहर अभियंता जनार्दन फुलारी, शिवशंकर सदावर्ते, बापूसाहेब मांडवडकर आदींनी सहकार्य केले.
प्रभाग आरक्षण (अ) आरक्षण (ब)
१ अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला
२ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
३ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
४ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
५ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
६ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
७ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
९ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
१० सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
११ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
१२ अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण
१३ अनु. जाती महिला सर्वसाधारण
नांदगाव : दहा द्विसदस्यीय प्रभागात दहा जागा महिलांसाठी आरक्षित
नांदगाव नगरपरिषदेची आरक्षण सोडत लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती करता राखीव ठेवण्यात आलेल्या चार जागांपैकी महिलांसाठी आरक्षित झालेल्या दोन जागांची सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. चिठ्ठीत प्रभाग ९ अ आणि प्रभाग ३ अ ची चिठ्ठी निघाल्याने या दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या. समृद्धी राजेंद्र पाटील आणि यश उमेश चंडाले या शाळकरी विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढल्या.
नांदगाव नगरपरिषदेतील एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे व या जागेवर मागच्या पंचवार्षिक मध्ये महिला सदस्य असल्याने व अशा जागेचे वाटप चक्रानुक्रमे फिरविण्याची तरतुद नगर परिषद अधिनियम डिसेंबर २०२१ मध्ये असल्याने यावर्षी अनुसूचित जमातीची जागा महिलेसाठी आरक्षित नाही. दहा द्विसदस्यीय प्रभागात दहा जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तेजस चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी साेडत जाहीर केली.
निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण : आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जमातीसाठी एकमेव असलेली जागा महिलांसाठी राखीव नाही, त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण निघाले तर कसे होणार असा प्रश्न माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी निवडणूक झाल्यावर नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघणार असल्याने असा प्रश्न उद्भभवणार नाही असे सांगितले
मनमाड : नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीवर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया
नगरपालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेच्या आरक्षण सोडत अध्यासी अधिकारी तथा मालेगावचे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल व कर्मचाऱ्यांनी या सभेचे नियोजन केले. दोन लहान मुलांच्या हस्ते प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली.
शहरात एकूण १६ प्रभाग तयार झाले आहे. त्यात १५ प्रभागांतून द्विसदस्यीय रचनेनुसार प्रत्येकी दोन असे एकूण ३० तर सोळाव्या मोठ्या प्रभागांतून तीन सदस्य म्हणजे एकूण ३३ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
आता प्रभाग ३, ४, ५, ८, १०, १४, १५ आणि १६ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. एसटी प्रवर्गासाठी ५ आणि १३ हे प्रभाग तर एकूण १७ जागा महिला आरक्षित आहे. तर ११जागा सर्वसाधारण महिला याअंतर्गत समाविष्ट आहेत. त्यानुसार आता १ (ब), २ (ब), ३ (ब), ४ (ब), ५ (ब), ६ (ब),८ (ब), ९ (ब), ११ (ब), १५ (ब) आणि १६(क) या सर्व प्रभागाच्या जागा सर्वसाधारण (जनरल) झाल्या आहेत. या आरक्षण सोडतीवर राजकीय क्षेत्रांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांसह काही जण याविरुद्ध पालिकेत आक्षेप घेऊन कोर्टातही जाण्याच्या तयारीत आहे.
सिन्नर : नगरपालिकेत ३० पैकी १५ जागांवर महिला आरक्षण जाहीर
सिन्नर नगरपरिषदेचे प्रभागनिहाय महिला आरक्षणात ३० पैकी १५ जागांवर महिलांचे आरक्षण निघाले आहे. प्रत्येक प्रभागातून एक महिला नगरपालिकेत निवडून जाणार आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक ३ अ आणि ४ अ येथे अनुसूचित जातीच्या महिलांचे तर प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये अनुसूचित जमाती महिलेचे आरक्षण निघाल्याने प्रबळ दावेदारांची पंचाईत झाली आहे.
प्रशासकीय अधिकारी अर्चना पठारे, मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजेला चिठ्ठी पद्धतीने महिला आरक्षण सोडत काढण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचे साहिल बर्डे, साक्षी बर्डे या दोन विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठी टाकून आरक्षण काढण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी उपमुख्य अधिकारी रोहित पगार, सचिन कापडणीस, भूषण नवाल, सौरभ गायकवाड, आरोग्य निरीक्षक रवी देशमुख यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार उपस्थित होते. महिला आरक्षणात सर्वसाधारण गटासाठी १२, अनुसूचित जातीसाठी २, अनुसूचित जमातीसाठी १ अशा ३० पैकी १५ जागा म्हणजेच ५० टक्के महिला आरक्षण टाकण्यात आले.
चांदवड : १० जागा महिलांसाठी आरक्षित
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० प्रभागांच्या एकूण २० जागांसाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यात २० जागांपैकी १० जागा चिठ्ठी सोडत पद्धतीने महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.
५० टक्के आरक्षणानुसार २० जागांपैकी १० जागांच्या महिला आरक्षणासाठी प्रारंभी दिलेल्या निर्देशानुसार लोकसंख्या विचारात घेऊन अनुसूचीत जातीसाठी प्रभाग ८ व ९, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग २, ४ व १० हे निश्चित करण्यात आले. उर्वरित १, ३, ५, ६ व ७ हे पाच प्रभाग सर्वसाधारण निश्चित झाले. दिलेल्या वैधानिक सूचनेनुसार अनुसूचित जातीच्या दोनपैकी एक जागा चिठ्ठी सोडत पद्धतीने महिलेसाठी आरक्षीत करण्यात आली. त्यात ९ अ ही जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाली. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या तीनपैकी दोन जागा चिठ्ठी काढून आरक्षित करण्यात आल्या.
त्यात प्रभाग २ व १० हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले. त्यात पुन्हा चिठ्ठी काढून २ब व १०अ या जागा अनुसूचीत जमाती महिलेसाठी राखीव झाल्या. उर्वरित महिलांच्या सात जागा या सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यासाठी सर्वसाधारण प्रभाग क्र. १, ३, ५, ६, ७ तसेच उर्वरित प्रभाग ४ व ८ या प्रत्येक प्रभागातील प्रत्येकी एक जागा चिठ्ठी सोडत काढून सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आली. त्यात १ब, ३अ, ५अ, ६अ, ७ब, ४अ, ८ब या सात जागा आरक्षित झाल्या. याप्रमाणे प्रत्येक प्रभागातील एक जागा महिला आरक्षित झाली. आरक्षण सोडतीनंतर नगरसेवक पदासाठी इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’असे वातावरण दिसून आले. आरक्षण सोडतीसाठी नगरपरिषद कार्यालयीन प्रमुख हर्षदा राजपूत, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता शेषराव चौधरी, तुषार बागूल, अमोल आहेर यांनी सहाय्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.