आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांत भीती:फुलेनगरला बिबट्या जेरबंद

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फुलेनगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. काहीशा दहशतीखाली वावरणाऱ्या येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे ज्या दिवशी बिबट्या पकडला त्याच दिवशी पठाडे वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या भगत मळ्यात दोन बिबट्यांचे ग्रामस्थांना दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये या जंगली श्वापदाची भीती कायम आहे.

माळवाडी परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्रीचा वीजपुरवठा असल्याने आणि तोही पूर्ण दाबाने मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आणि शेतात इतर कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशा जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पठाडे वस्तीच्या आसपास सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाने मंगळवारी खंडेराव पठाडे यांच्या गट नंबर ३७८ मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.

त्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. तब्बल सहा ते सात दिवसांनंतर रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सोमवारी (दि. २) सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रमणी तांबे, वनमजूर नारायण वैद्य, जगन जाधव, सखाराम मधे, संतोष मेंगाळ यांनी पिंजरा लावलेल्या घटनास्थळी जात त्यास ताब्यात घेऊन मोहदरी येथील वनउद्यानात आणले. पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या अंदाजे ७ ते ८ वर्षांचा असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी साळवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...