आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जागा बांधकामकडे हस्तांतरणाचे पत्र; नांदगावी साकारणार शिवसृष्टी

नांदगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुन्या पंचायत समितीची जागा शिवसृष्टी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याने शहरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तांत्रिक कारणामुळे येथे शिवसृष्टी उभारण्यात अडचणी येत असल्याने पर्यायी जागेत शिवसृष्टी उभारण्याची मागणी होती. गिरणानागर हद्दीतील येथील पंचायत समिती प्रशासकीय संकुलात स्थलांतरित झाल्याने जुन्या पंचायत समितीची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडे सादर केला होता. जुनी इमारत वापरात नसल्याने अवर सचिव केशव जाधव यांनी १.२१ हेक्टर जागा, शासकीय गोदामे आणि निवासस्थाने वगळून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना दिला होता.

बनसोड यांनी आदेशाची अंमलबजावणी करत गटविकास अधिकारी, नांदगाव यांना जागा हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याने शिवसृष्टी उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसृष्टीच्या माध्यमातून शहरवासीयांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजणार असल्याने तसेच शिवसृष्टी शहरातील आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...