आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीओंकडे:मालेगावी मिळेना पूर्णवेळ तहसीलदार, पंचायतीचा भारही चांदवडच्या बीडीओंकडे

मुजम्मिल इनामदार | मालेगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दाेन महिन्यांत तिसऱ्या प्रभारी तहसीलदारांकडे महसूलची सूत्रे आली आहेत. तर चांदवडच्या बीडीओंनी मालेगाव पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार सांभाळला आहे. दाेन्ही महत्त्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नसल्याने बहुतांश कामांना ब्रेक लागला आहे. प्रभारी पदांचा सुरू असलेला खाे-खाे व नियुक्तीच्या राजकीय हस्तक्षेपी खेळीमुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘प्रभारी पदभार अन‌् समस्या अपार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत हे १९ सप्टेंबर २०२२ पासून रजेवर आहेत. त्यांच्या रिक्त पदाचा पदभार दीपक पाटील यांच्याकडे साेपविण्यात आला हाेता. पाटील यांनी पूर्वी येथे तहसीलदार म्हणून काम केले हाेते. त्यामुळे त्यांना बढती मिळेपर्यंत पूर्णवेळ नियुक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त हाेत हाेती. मात्र, पाटील यांना जेमतेम महिना झाला असताना त्यांना पुन्हा नाशिकला माघारी पाठविण्यात आले. त्यांच्या जागेवर नाशिक निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. हा आदेशदेखील औटघटकेचा ठरला.

पदभार घेण्यापूर्वीच त्यांचा आदेश रद्द झाला. आता नाशिकचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार हे प्रभारी तहसीलदार म्हणून कामकाज पहात आहे. एकही अधिकारी पदावर न स्थिरावल्याने रेशनकार्ड, विविध प्रकारचे दाखले, अर्धन्यायिक तक्रारींचे निवारण, महसूल वसुली, लाभार्थी याेजनांची कामे थंडावली आहेत. महसूलनंतर पंचायत समितीचा पदभारही प्रभारी अधिकाऱ्याच्या हाती गेला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी ११ नाेव्हेंबरला जिल्हा परिषदेची कामकाज आढावा बैठक घेतली हाेती. या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या याेजना राबविण्यात अकार्यक्षम ठरल्याच्या कारणावरून मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. १४ नाेव्हेंबरपासून चांदवडचे बीडीओ महेश पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार दिला गेला आहे. दाेन्ही ठिकाणची जबाबदारी सांभाळताना या अधिकाऱ्यांची कसरत हाेत आहे. पूर्णवेळ नियुक्तीच्या घाेळामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली गेली आहे.

एकावर सक्ती, दुसऱ्याची स्वयंसक्ती
गटविकास अधिकारी देवरे यांनी आपल्या कार्यकाळात चांगले प्रशासकीय कामकाज केले आहे. मात्र, त्यांना अचानक सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. त्यांचा आत्मविश्वास बाेलका असल्याने त्यांच्यावरील कारवाईचे गूढ वाढले आहे. असाच काहीसा प्रकार तहसीलदार राजपूत यांच्याविषयी झाला आहे. मंत्र्यांच्या तालुक्यात काम करताना राजपूत यांनी प्रचंड दक्षता घेतली हाेती. हीच दक्षता त्यांच्या अंगाशी आल्याचे सांगितले जाते. राजपूत यांनी काैटुंबिक व आराेग्याचे कारण दाखवून टाकलेली दीर्घ रजा-देखील एक रहस्य ठरली आहे.

अपर अधीक्षक नियुक्ती चर्चेत
शहराच्या अपर पाेलिस अधीक्षकपदाची नियुक्तीही चांगलीच चर्चेत राहिली. नीलेश तांबे यांच्या रूपाने शहराला आयपीएस अधिकारी लाभल्याचा आनंदही मालेगावकरांसाठी क्षणिक ठरला. तांबे यांचा नियुक्ती आदेश बदलून महाराष्ट्र पाेलिस सेवेतील अधिकाऱ्यांची लागलेली वर्णी राजकीय हस्तक्षेपाविषयी संशय वाढविणारी आहे.

बातम्या आणखी आहेत...