आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयिताची हत्या:मालेगावी 10 गंभीर गुन्ह्यांतील हद्दपार संशयिताची हत्या

मालेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोघांनी धारदार हत्यारांनी वार करत तरुणाची हत्या केली. गाेल्डननगर भागात साेमवारी रात्री साडेबारा वाजता हत्येचा प्रकार घडला. सलमान अहमद सलीम अहमद (२८) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले हाेते. दरम्यान, हत्येनंतर फरार झालेल्या दाेघा संशयितांना पवारवाडी पोलिसांनी मनमाडमधून अटक केली.

मयत सलमान अहमद हा बाग-ए-महेमूद भागात वास्तव्यास हाेता. त्याचे काही महिन्यांपूर्वी संशयित ताैसिफ अहमद रफीक अहमद ऊर्फ राजू याच्यासाेबत वाद झाले हाेते. या भांडणाची कुरापत काढून ताैसिफने सलमान याच्याशी पुन्हा वाद घातला. बाचाबाचीनंतर ताैसिफने त्याचा साथीदार अकिल अहमद मोहंमद सुगराती ऊर्फ पापा याच्या मदतीने सलमानवर हल्ला केला. धारदार हत्यारांनी त्याच्या डाेक्यावर, चेहऱ्यावर, पोटात वार करत सलमानला जिवे ठार मारले. हल्ला करून दोघेही संशयित फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्याने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, सहायक निरीक्षक डी. जे. बडगुजर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सलमानचा मृतदेह सामान्य रुग्णालयात हलवला. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने बंदोबस्त वाढवण्यात आला. सलीम अहमद जब्बार अहमद यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिसांनी दोघांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दाेघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मयत सराईत गुन्हेगार
मयत सलमान हा सराईत गुन्हेगार हाेता. त्याच्याविराेधात १० गुन्हे दाखल आहेत. यात घरफाेडी, जबरी चाेरी, मारहाण, जुगार आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हद्दपारीच्या काळात २०२१ मध्ये अटक करण्यात आली हाेती. २८ नाेव्हेंबर २०२० राेजी त्याला धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यांमधून दाेन वर्षांसाठी हद्दपार केले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

संशयित बसने फरार
हल्ला करून दाेघे संशयित दुचाकीने मुंबई-आग्रा महामार्गावर पाेहाेचले. येथे एका हाॅटेलजवळ दुचाकी उभी करून ते मनमाडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या पाेलिसांनी बसचा पाठलाग करत मनमाड गाठले. दाेघे बसमधून खाली उतरताच त्यांना ताब्यात घेतले. दाेघांनी मनमाडला पाेहाेचून रेल्वेने पलायन करण्याचे नियाेजन केले हाेते. मात्र, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे संशयित पाच तासांत जेरबंद झाले.

बातम्या आणखी आहेत...