आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे:मालेगावी जुना आग्राराेड कामासाठी बुधवारी महानगरपालिकेसमाेर धरणे

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुन्या आग्राराेडच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाचे टेंडर झाले आहे. महिना उलटूनही कामाची वर्क ऑर्डर जारी झालेली नाही. जनता धूळ व मातीचा सामना करत आहे. महापालिकेने साेमवारपर्यंत काम सुरू करावे, अन्यथा बुधवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मनपासमाेर धरणे आंदाेलन छेडू, असा इशारा माजी आमदार रशिद शेख यांनी दिला.

शेख यांनी माजी महापाैर ताहेरा शेख व शिष्टमंडळासह गुरुवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांची भेट घेतली. शेवटच्या बजेटमध्ये आग्राराेडसाठी १५ काेटींची तरतूद केली हाेती. यात वाढ करून २० काेटींचा निधी मंजूर झाला. या कामाचे महिन्यापूर्वी टेंडर निघाले आहे. मात्र, कामाची वर्कऑर्डर निघालेली नाही. मनपा प्रशासकांच्या मनमानीचा हा परिणाम आहे. त्यांना महापालिकेत थांबायला वेळ नाही.

अर्धवट रस्त्यामुळे आजही धूळ व मातीचे साम्राज्य आहे. जनतेच्या अडचणींशी प्रशासकांना कुठलेही देणेघेणे नसल्याचा आराेप शेख यांनी केला. साेमवारी काम सुरू न झाल्यास बुधवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी नगरसेवक धरणे आंदाेलन छेडतील. नॅशनल कंपाउंडचे बेकायदा अतिक्रमण अद्याप ताेडले गेलेले नाही. सदर अतिक्रमणाच्या अडथळ्यामुळे गटारीचे कामही रखडले आहे. मनपा अधिकाऱ्यांनी बेकायदा अतिक्रमण तातडीने ताेडावे, अशी मागणी शेख यांनी केली. मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त गिरी यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक शकील जानी बेग, अस्लम अन्सारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...