आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:मालेगावी खड्डे, स्वच्छताप्रश्नी मध्यवर्ती समितीचे गणेशमूर्तीसह ठिय्या आंदाेलन

मालेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांवरील खड्डे, मंडळांच्या परिसरात तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य आदी समस्या मांडत शहर मध्यवर्ती गणेशाेत्सव समितीने साेमवारी दुपारी ठिय्या आंदाेलन केले. समिती पदाधिकाऱ्यांनी सरदार चाैकात ठिय्या देत आंदाेलनस्थळी गणेशमूर्तीही ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर मनपा अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.

शहरात गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा हाेत आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे खड्डेमय रस्ते, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता, दुर्गंधीची समस्या कायम आहे. चार दिवसांवर विसर्जन येऊन ठेपले असताना खड्डे बुजविण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत मिरवणुका कशा जाणार, असा संतप्त प्रश्न रामदास बाेरसे यांनी उपस्थित केला. पावसाचे पाणी साचून गटारी तुंबल्या आहेत. हेच पाणी मंडळांजवळून वाहते. भक्तांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सूचना देऊनही मनपाने कुठलेच काम हाती न घेतल्याचा आराेप करत समितीचे पदाधिकारी गणरायाची मूर्ती मांडीवर ठेवून ठिय्या देऊन बसले हाेते.

मनपा प्रशासनाविराेधात गणेशभक्तांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देत आंदाेलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर समितीने आंदाेलन मागे घेतले. आंदाेलनात समितीचे अध्यक्ष श्याम गवळी, जितू भुसे, कैलास तिसगे, भरत पाटील, गणेश पाटील, अर्जुन भाटी, रिकी पाटील, गाेपाळ अहिरे, चेतन आसेरी, मच्छिंद्र शिर्के, पवन पाटील, संताेष गवळी यांच्यासह गणेशभक्त माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांची फक्त आश्वासने महापालिका प्रशासनाचा बोगस कारभार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका झाल्या. बैठकांमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी सर्व समस्या सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र, एकही आश्वासन पाळले नाही. जयभवानी मंडळाच्या जवळून गटारीचे पाणी वाहत आहे. तक्रार करूनही मनपाने दखल घेतली नाही. गणेशभक्तांनी रस्त्यावर उतरावे हीच अधिकाऱ्यांची इच्छा दिसत आहे. मनपा आपला मनमानी कारभार कायम ठेवणार असेल तर गणेशभक्तांना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला. समिती पदाधिकाऱ्यांनी मनपाविरोधात घोषणाबाजी करत गणपती आरती म्हटली.

बातम्या आणखी आहेत...