आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका प्रशासनाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने १२ कोटी रुपयांची वाढ केल्यानंतर महापौरांनी प्राप्त अधिकारांचा वापर करीत फेरफार करून अंतिम ६६३ कोटी ५५ लाख ६ हजार ८५ रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित केले आहे. यात जमा बाजूत ६७ कोटी तर खर्चात ७० कोटींची वाढ झाली असून प्रशासकीय खर्चात साडेतीन कोटींची कपात करण्यात आली आहे. मात्र, सभागृहाचा कार्यकाळ संपल्याने अंदाजपत्रक अंमलबजावणीवर सर्वव्यापी प्रशासकीय प्रभाव दिसण्याचे संकेत आहेत. सन २०२२-२३ या वर्षासाठी पालिका प्रशासनाने ५८४ कोटी ५९ लाख १ हजार ८८ रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने यात सुधारणा करीत १२ कोटी रुपयांची वाढ सुचवून ५९६ कोटी ४० लाख ८९ हजार ४७ रुपयांचे अंदाजपत्रक पालिका सभागृहाला सादर केले होते. दि ७ मार्च २०२२ रोजी झालेल्या महासभेत महापौरांना अंदाजपत्रकात फेरफार करण्याचे अधिकार देण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. महापौर ताहेरा शेख यांनी या अधिकारांचा वापर करीत ६६३ कोटी ५५ लाखांचे सुधारित अंतिम अंदाजपत्रक तयार करून अंमलबजावणीसाठी आयुक्त कार्यालयाला सुपूर्द केले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच आयुक्त कार्यालयाकडे अंदाजपत्रक ठराव महापौरांच्या स्वाक्षरीसह देण्यात आलेले असले तरी अद्याप त्यावर आयुक्तांनी अंमलबजावणीचे आदेश जारी केलेले नाहीत. विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात आला असून सोमवारपासून पालिकेत प्रशासकीय कारकीर्द सुरू होणार असल्याने सर्वच अंदाजपत्रक अंमलबजावणीआधी प्रशासकीय अधिकारात बदलण्याचे संकेत आहेत.
प्रशासकीय कारकीर्द आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी अद्याप अंदाजपत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. सोमवारी त्यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू होईल, यानंतर प्रशासकीय अधिकारात अंदाजपत्रकावर निर्णय होतील, त्यामुळे प्रशासनाच्या सर्वाधिकारांचा प्रभाव व फेरबदल लक्षात येतील. यात नागरिकांच्या मागण्यांची प्रशासन कितपत दखल घेते हेदेखील स्पष्ट होईल.
प्रस्तावित कामांसाठी २३ कोटी गेल्या वर्षाच्या प्रस्तावित (स्पिलओव्हर) कामांसाठी २३ कोटी रुपये अतिरिक्त तरतूद राखीव आहे. याचा बोजा चालू अंदाजपत्रकावर पडला आहे. मात्र यात प्रशासकांकडून फेरबदल होण्याची शक्यता आहे.
आठवडाभरात अंमलबजावणी ^महापौरांकडून प्राप्त अंदाजपत्रकाचा अभ्यास करून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल. मागील प्रस्तावित जी कामे अद्याप सुरूच झाली नाहीत किंवा कार्यादेश देऊनही सुरू नसतील ती तत्काळ रद्द केली जातील.शहराच्या गरजेच्या दृष्टीने पारदर्शक कामांचा अंदाजपत्रकात समावेश केला जाईल. आठवडाभरात नवीन अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होईल. - भालचंद्र गोसावी, आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.