आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पर्यावरण दिन:‌विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; माझे झाड, माझा सेल्फी अभियान

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील तालुका प्रशासकीय संकुलात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिंच आणि जांभळाचे झाड लावून तहसीलदार प्रमोद हिले यांच्या संकल्पनेतून ‘माझे झाड, माझा सेल्फी’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यामुळे ‘माझे झाड, माझा सेल्फी’ अभियान तालुक्यात तहसीलदार प्रमोद हिले यांनी सुरू केले आहे.

या संकल्पनेचा उद्देश जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याद्वारे पृथ्वीचे संवर्धन करणे हा आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापुढे एक झाड लावावे आणि त्या झाडासोबत आपला सेल्फी व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकावा. जेणेकरून इतरांनाही या संकल्पनेची प्रेरणा मिळून अधिकाधिक प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले जाईल, असे आवाहन तहसीलदार हिले यांनी केले आहे.

प्रशासकीय संकुलात प्रत्येक अधिकाऱ्यांना एक झाड भेट म्हणून देण्यात आले. ते झाड त्यांनी माझ्या मुलाचे झाड किंवा माझ्या मुलीचे झाड समजून लावावे व त्याचे संवर्धन करावे. पर्यावरण हा आपल्या जगण्यासाठीचा अत्यावश्यक घटक आहे व येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे जतन व संवर्धन केले पाहिजे, हा या संकल्पनेमागचा हेतू तहसीलदार हिले यांनी स्पष्ट केला.

याप्रसंगी गट विकास अधिकारी अन्सार शेख, शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, उपअधीक्षक भूमी अभिलेख राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, निवासी नायब तहसीलदार पंकज मगर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे विजय भोरकडे, सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...