आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काट्याची टक्कर:पिंपळगावी विकासकामांकडे दुर्लक्षाचा फटका, आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलला धक्का

पिंपळगाव / राकेश बनकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या तिरंगी लढतीत सरपंचपदी दिव्य विकास पॅनलचे उमेदवार भास्करराव बनकर विजयी झाले असून त्यांच्याबरोबर पॅनलचे १२ सदस्य निवडून आल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. संघर्ष पॅनलच्या सतीश मोरे हे दुसऱ्या क्रमांकाचे मतदान घेणारे उमेदवार ठरले असून त्यांचे ४ उमेदवार निवडून आले तर आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास पॅनलचे गणेश बनकर हे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. गतवेळी आमदार बनकर यांच्या पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले होते. यावेळी मात्र एकच उमेदवार विजयी झाला. सतीश मोरे यांनी भास्करराव बनकर यांना काट्याची टक्कर दिली.

पिंपळगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील दोन नंबरची असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे होते. हा निकाल नक्कीच अनपेक्षित लागला. गेल्या पाच वर्षांपासून आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अलका बनकर यांचे वर्चस्व होते, मात्र २०२२ च्या निवडणुकीत तीन पॅनल तयार झाल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली. त्यामध्ये सरपंचपद हे थेट जनतेमधून असल्याने काट्याची टक्कर होणार हे तर नक्कीच होते. यासाठी दिव्य विकास पॅनलतर्फे भास्करराव बनकर, शहर विकास आघाडीतर्फे गणेश बनकर तर संघर्ष पॅनलतर्फे सतीश मोरे यांनी अर्ज भरला होता. ही लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र गावात दिसून येत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. निकाल लागल्यानंतर ११३ मतांनी सरपंचपदी भास्करराव बनकर विराजमान झाले. त्यांना सतीश मोरे यांनी चांगलीच टक्कर दिली. मात्र सत्ताधारी गणेश बनकर यांना या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. या पराभवाचे कारण हे जुना आग्रा रोडच्या कामाबद्दल नागरिकांची नाराजी व मूलभूत सुविधांकडे झालेले दुर्लक्ष अशी चर्चा आहे.

तसेच भास्कर बनकर यांना जनतेचा कल व पिंपळगाव सोसायटीमध्ये मिळालेली संजीवनी हा मुद्दा या निवडणुकीला कलाटणी देणारा ठरला. दोन नंबरची मते घेणाऱ्या सतीश मोरे यांनी ऐनवेळी पॅनल तयार केल्याने या दोन्ही पॅनलसाठी मोठा धक्काच होता. सतीश मोरे यांच्या उमेदवारीने ग्रामपंचायतमध्ये धक्कादायक निकाल लागतो की काय असे चित्र झाले, मात्र अखेर या निवडणुकीत अनुभवी असलेल्या भास्करराव बनकर यांनी सतीश मोरे यांचा ११३ मतांनी पराभव केला. यावेळी भास्करराव बनकर यांना ८३३५ मते, सतीश मोरे यांना ८२२२ मते तर गणेश बनकर यांना ६००० मते पडली. मात्र पुढे येणारी निवडणूक ही गणेश बनकर व सतीश मोरे या दोन युवा नेतृत्वाला नक्कीच प्रेरणादायी असेल.

बातम्या आणखी आहेत...