आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणपती मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी; हम सब एक है च्या घाेषणांनी कुसुंबाराेड दुमदुमला

मालेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक सण-उत्सवात जातीय सलाेखा व एकतेचे दर्शन घडविणाऱ्या मालेगावकरांनी गणेशाेत्सवातही आपला भाईचारा कायम राखला आहे. कुसुंबाराेडने शुक्रवारी रात्री द्याने एकता गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी स्वागत केले. ‘हिंदू-मुस्लिम एकता झिंदाबाद, हम सब एक है’च्या घाेषणांनी परिसर दणाणून गेला हाेता. पाेलिस, महसूल व शांतता समिती सदस्यांनी या अनाेख्या परंपरेचे काैतुक केले.

मालेगावची राज्यभर अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. शहराचा पूर्व इतिहास पाहता सर्व सण-उत्सवकाळात कडेकाेट बंदाेबस्त तैनात केला जाताे. मात्र, अनेक वर्षांपासून शहराची शांतता टिकून आहे. एकमेकांच्या सण व उत्सवांमध्ये सहभागी हाेणाऱ्या सर्वधर्मीयांनी आपली परंपरा गणेशाेत्सवातही कायम ठेवली आहे. द्याने भागातील एकता गणेश मंडळाची मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून मार्गस्थ हाेत असते. या मार्गावर धार्मिकस्थळे असल्याने पाेलिसांना दरवर्षी या मिरवणुकीवेळी कुसुंबाराेडवर माेठा पाेलिस फाैजफाटा तैनात करावा लागताे. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशाेत्सव साजरा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये माेठा जल्लाेष हाेता.

प्रशासन मिरवणुकांवर विशेष लक्ष ठेवून असताना मालेगावकरांनी आपले शहर, आपले उत्सव समजून एकतेचे दर्शन घडविले. द्याने एकता मंडळाची मिरवणूक कुसुंबाराेडवर येताच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. मंडळ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना हार घालून त्यांचे जल्लाेषात स्वागत केले. शहराची एकता कायम राहील, असा विश्वास उपस्थित मुस्लिम व हिंदू बांधवांनी व्यक्त केला. याप्रसंगी अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शांतता समितीचे सदस्य केवळ हिरे, रियाज अन्सारी, बशीर शाह, अॅड. हिदायततुल्ला, हरिप्रसाद गुप्ता, गुलाब पहिलवान, शफिक राणा आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...