आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडामोड:सिन्नर बाजार समितीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याचा; अशासकीय प्रशासकीय मंडळ नेमणुकीच्या हालचाली

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बाजार समितीचा कार्यभार प्रशासक म्हणून इगतपुरीच्या सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांच्याकडे सोपविण्यात आलाआहे. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शिफारशीनुसार बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ नेमणुकीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रशासकीय मंडळात सदस्यांच्या निवडीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.

संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येऊन जवळपास दीड-दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. कोरोना संकटामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळत गेली. मात्र, महिनाभरापूर्वीच प्रशासक म्हणून सहायक निबंधक एकनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली. तथापि, नव्याने इगतपुरीच्या सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभारही स्वीकारला आहे. मात्र, अशातच आमदार कोकाटे यांच्या शिफारशीनुसार बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ नेमणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी संबंधितांना पात्रतेसंबंधी तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

संबंधितांनी शेतकरी असल्याचा पुरावा, शेतसारा येणेबाकी नसल्याबाबतचा पुरावा, पोलिसांकडील चारित्र्य पडताळणीचा दाखला, भूषविलेल्या व भूषवित असलेल्या विविध पदांबाबत तसेच सामाजिक कार्याबद्दल माहिती, नावात बदल असल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्याकडील येणे कर थकीत नसल्याबाबतचा दाखला व ना हरकत दाखला तसेच विकास सोसायटीचा येणे कर्ज थकबाकी नसल्याबाबतचा दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल सहायक निबंधकांना सादर करायचा असल्याचे नमूद आहे. संबंधितांनी या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांचे प्रशासकीय मंडळाची बाजार समितीवर नेमणूक होणार आहे. नेमणूक झाल्यानंतर या मंडळाला बाजार समितीची वार्षिक उलाढाल व वाढावा, तूट तसेच विविध बाबींची माहिती देण्याबाबतही सूचित करण्यात आलेले आहे.

या सात सदस्यांच्या नावांची शिफारस
आमदार कोकाटे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळाची शिफारस करताना सात सदस्यांची नावे सूचविली आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अनिल दशरथ शेळके (शिवडे), पंढरीनाथ पांडुरंग आव्हाड (दातली), अशोक त्र्यंबक शिंदे (ठाणगाव), सुनंदा विनायक घुमरे (सांगवी), कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजाहिद इलियास खतीब (सिन्नर) तर शिवसेनेचे माजी नगरसेवक गोविंदराव लोखंडे व माजी तालुकाप्रमुख सोमनाथ नामदेव तुपे (बेलू) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी चार, शिवसेना दोन व कॉंग्रेस एक याप्रमाणे सदस्यांना स्थान देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...