आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाचा प्रकोप वाढताच पाणीटंचाईच्या झळाही असह्य झाल्या आहेत. जलस्त्रोत आटल्याने टंचाईच्या विळख्यात सापडलेल्या चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. लोकसंख्येनुसार दररोज दहा फेऱ्यांचे नियोजन करून या चारही गावांना एक लाख ४१ हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी भरण्यासाठी तीन खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. झाडी व जळगाव निंबायती गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या गावांची प्रत्यक्ष पाहणी करून टँकर सुरू केले जाणार आहेत.
कजवाडे व रामपुरा गावांना २२ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. एरंडगाव व सावकारवाडीत पाणीटंचाई भासू लागताच त्यांचे प्रस्ताव मंजूर करत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दिवसभरात २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने दाेन फेऱ्या केल्या जात आहेत. कजवाडे गावास दिवसाला २७ हजार लिटर पाणी मिळत आहे. तर रामपुराला १८ हजार लिटर पाणी पुरवून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.
गावांची संख्या वाढणार
गतवर्षी सावकारवाडी, कजवाडे, रामपुरा, एरंडगाव व झाडी ही पाच गावे व दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. रोज चार टँकरच्या मदतीने १२ खेपा सुरू होत्या. यंदा चार गावे टंचाईच्या सावटाखाली आहेत. तर दोन गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे सहायक पवार यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.