आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेजना’:गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी याेजना’

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश मंडळांना पाेलिस, मनपा, महावितरण व महसूल विभागाच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी शहरात ‘एक खिडकी याेजना’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातून या परवानग्या मिळणार आहेत. मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दि. ३१ ऑगस्टला गणरायाचे आगमन हाेत आहे. दाेन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशाेत्सव साजरा हाेत असल्याने यंदा गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्तीच्या स्थापनेसाठी मंडळांना परवानगी बंधनकारक आहे. मंडळांची परवानग्यांसाठी धावपळ हाेऊ नये, त्यांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात म्हणून प्रशासनाने एक खिडकी याेजना अमलात आणली आहे.

तहसील कार्यालयातून पाेलिस, मनपा, महावितरण व महसूलशी संबंधित परवानग्या दिल्या जाणार आहेत. येथे नायब तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली परवानगी अर्ज दाखल करणे, परवानगी देण्याचे काम हाेणार आहे. चारही विभागांचा प्रत्येकी एक कर्मचारी हजर राहून परवानगी प्रक्रियेची पूर्तता करणार आहेत. मंडळांना परवानग्यांच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास त्यांनी पाेलिस किंवा महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा
पाेलिस प्रशासनाने गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी अर्ज सादर करण्याची सुविधा दिली आहे. मंडळांना https://citizen.mahapolice.gov.in या सिटिझन पाेर्टलवरून ऑनलाइन परवानगी अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन प्राप्त अर्जांची तत्काळ पूर्तता करुन परवानगी देऊन याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कामात दिरंगाई झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाणार आहे.

आजही मार्गांची पाहणी
मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कॅम्प भागातील मिरवणूक मार्गांची पाहणी केली. कॅम्प भागात माेठ्या प्रमाणावर गणरायाची स्थापना हाेत असते. प्रमुख मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी समजून घेण्यात आल्या. गेल्या वर्षी शहरात २९१ मंडळांची स्थापना झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...