आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कोरोना रुग्ण नियंत्रणांचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी जानेवारी महिन्यात ऑपरेशन ‘मालेगाव मॅजिक’ अंतर्गत सर्व्हे झाला होता. सर्व्हेमध्ये वयोगटाच्या वर्गवारीनुसार २७३५ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणी अहवालातून मालेगाव मॅजिकचा उलगडा झाला आहे. तब्बल ९६% जणांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्तीचे प्रमाण १००% आढळून आले आहे. दांडग्या रोगप्रतिकारशक्तीमुळेच कोरोनाच्या डेल्टा किंवा ओमायक्रॉनसारख्या विषाणूंचा फारसा प्रादूर्भाव शहरात दिसून आला नाही. दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हेला १२ मे पासून प्रारंभ होत असल्याची माहिती सर्व्हे पथकांचे समन्वयक डॉ. मिनहाज सय्यद यांनी दिली.
कोरोना उद्रेक काळात शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात राहिल्याने मालेगाव पॅटर्न राज्यभर चर्चेत आला होता. शहराच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अभ्यास सुरू केला आहे. जानेवारी महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत एका सर्व्हेचे नियोजन केले होते. सर्व्हेनुसार १२ जानेवारीपासून १८ ते ४५, ४५ ते ६० व ६० वर्षावरील व्यक्तींचे रक्त संकलन करून अर्जाद्वारे माहिती जाणून घेण्यात आली. संबंधित व्यक्तीचे राहणीमान, खानपान, कोविड काळातील काळजी आदी बाबी समजून घेतल्या होत्या. शहराच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील २० वार्डांमध्ये २२ पथकांच्या माध्यमातून २७३५ जणांच्या रक्ताचे नमूने घेतले होते.
धुळ्याच्या हिरे मेडिकल कॉलेजमध्ये संकलित केलेल्या रक्त नमुन्यांची तपासणी करून अॅण्टीबॉडीजचे प्रमाण तपासले गेले. विविध आजारांशी लढा देत शरिराला सुरक्षित ठेवण्याचे काम अॅण्टीबॉडीज अर्थात रोगप्रतिकारशक्ती करते. हीच रोगप्रतिकारशक्ती ९६% जणांच्या शरीरात १००% असल्याचे समोर आले आहे. ४% जणांमध्ये हे प्रमाण कमी दिसून आले. प्रथमदर्शनी रोगप्रतिकारशक्तीमुळेच मालेगावकरांनी कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. दुसरा सर्व्हे सामान्य रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. हितेश महाले, मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त वैद्यकीय महाविद्यालयांच्या २२ पथकांद्वारे होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.