आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचाईत:आरक्षण सोडतीमुळे मातब्बरांची पंचाईत; गटात संधी हुकलेल्यांचे गणावर लक्ष

भरत घोटेकर | सिन्नर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या मातब्बरांना आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. त्यामुळे गटात संधी हुकलेल्या उमेदवारांच्या गणात उड्या पडण्याची दाट शक्यता आहे.

सोमठाणे गटात शिवसेनेकडून भारत कोकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे या काका-पुतणीची ‘भावकीची’ लढत रंगण्याची चिन्हे होती. मात्र, हा गट पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने भारत कोकाटे पत्नीच्या माध्यमातून सिमंतिनी कोकाटेंना आव्हान देतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटातील दोन्ही गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने इच्छुकांना तलवारी म्यान कराव्या लागल्या आहेत.

नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने माजी सदस्या वनिता शिंदेंचे पती नामदेव शिंदे, बाजार समितीचे उपसभापती संजय खैरनार यांना थांबावे लागणार आहे. राष्ट्रवादीकडून ठाकर समाजात परिचित असलेले तुकाराम मेंगाळ यांना या गटात उमेदवारीची लॉटरी लागू शकते. नांदूरशिंगोटे गणही अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने दिग्गज इच्छुक गपगार झाले आहेत. शिवडे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले प्रभाकर हारक, शिवसेनेचे डॉ. रवींद्र पवार या‌ दोन्ही सरपंचांना व संजय सानप यांना आरक्षणाने दगा दिला आहे. हे तिघेही आपापल्या पक्षाकडून गणातील उमेदवार झाले तर नवल वाटायला नको.

मुसळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने वडांगळीचे माजी सरपंच योगेश घोटेकर, राजाराम मुरकुटे, ॲड. संजय सोनवणे, अनिल शिरसाठ, राजेंद्र चव्हाणके, दगू चव्हाणके या इच्छुकांची गोची झाली आहे. तर माजी सदस्या वैशाली खुळे यांचे हौसले बुलंद झाले आहे. पांगरी बुद्रुक आणि दापूर गट खुले झाल्याने येथे उमेदवारांची स्पर्धा वाढणार आहे. पांगरी बुद्रुक गटात विजय काटे, अरुण वाघ यांच्यात लढत रंगण्याची चिन्हे आहेत. तर दापूर गटात शिवसेनेकडून युवानेते उदय सांगळे, नीलेश केदार यांच्यापैकी एकाची उमेदवारी निश्चित होऊ शकते. त्यांना राष्ट्रवादीकडून माजी सभापती बाळासाहेब वाघ यांच्या माध्यमातून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

माळेगाव गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने सानप, बाेडके व कातकाडेंची काेंडी
माळेगाव गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप यांचे पती संजय सानप व आमदार कोकाटे समर्थक सुदाम बोडके यांच्यात लढत रंगणार होती. सानप यांचे चिंचोली गाव शिवडा गटात समाविष्ट झाले तरी विकासकामांच्या बळावर ते माळेगाव गटासाठी आग्रही होते.‌ पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम कातकाडे हेही या गटासाठी आग्रही होते. मात्र गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. कातकाडे, बोडके सौभाग्यवतींच्या माध्यमातून नायगाव गणावर दावा करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...