आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाची आवड असली तरी ती वयाच्या कोणत्याही वर्षी साकार होऊ शकते, मात्र त्यासाठी हवी असते जिद्द. सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील अनिता उगले यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण सोडल्यानंतर म्हणजे २४ वर्षांनंतर यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महिलांसमोर आणि अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
अनिता उगले यांनी १९९८ मध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतले, माध्यमिक शाळा ही बाहेरगावी असल्याने इच्छा असतानाही शिक्षण घेता आले नाही. नंतर सन २००० मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांना तीन अपत्ये झाली. मात्र अवघ्या सात वर्षांच्या सुखाच्या संसाराला नजर लागली अन् त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र, या दु:खातून सावरत त्यांनी दोन महिन्यांच्या मुलासह तिन्ही मुलांची जबाबदारी खांद्यावर घेत, संसाराची गाडी चालविण्यास सुरुवात केली. कधी शेतमजुरी, तर कधी बिगारीकाम करण्याला प्राधान्य दिले. मुलांसोबत सासू-सासरे यांच्या सांभाळ करू लागल्या. मुलांना बारागावपिंप्री येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेत घातले.
यावेळी त्या शेतमजुरी सोडत शाळेमध्ये मध्यान्ह भोजन योजनेत मदतनीस म्हणून काम करू लागल्या. त्यांचा प्रामाणिकपणा बघून प्राचार्य अशोक बागूल यांच्या सहकार्याने संस्थेने त्यांची चतुर्थ कर्मचारी म्हणून मानधनावर नियुक्ती केली. विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द, खेळणे, बागडणे बघून अनिता यांचीही पुन्हा रखडलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा जागृत झाली. त्यांनी प्राचार्य अशोक बागूल यांच्याकडे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. बागूल यांनीही त्यांच्या जिद्दीला सलाम करीत सकारात्मक निर्णय घेतला. शाळेतील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उगले यांचा १७ नंबर फॉर्म भरण्यासाठी सांगितले.
दिवसा संसाराचा गाडा, रात्री अभ्यास
अनिता उगले यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शाळेचे इन्चार्ज गुंजाळ यांनी परीक्षा फीसह इतर मदत केली. दिवसा संसाराचा गाडा तर रात्री अभ्यासाचा पाढा सुरू ठेवला. परीक्षा आली, परीक्षा झाली. आता वेळ होती निकालाची. त्यांच्या मनात धाकधूक सुरू हाेती, मात्र गुणपत्रक हातात आले अन् त्या पहिल्याच प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.