आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैर लाकडाची तस्करी:बाेरपाडा शिवारात गुजरातमधील पिकअप जप्त

सुरगाणा, बोरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाऱ्हे वनपरिक्षेत्रात गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना वनकर्मचाऱ्यांना बोरपाडाजवळ रस्त्याच्या कडेला पिकअप उभी दिसली. संशयावरून झडती घेतली असता त्यात खैराचे वीस नग आढळले. वनकर्मचाऱ्यांनी ते हस्तगत केले.

पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा शिवारात एका पिकअप (जीजे १५ झेड ४४७०) या वाहनातून खैर लाकूड हस्तगत करण्यात आले. नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग याच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर, फिरत्या पथकाचे अधिकारी सुरेश गवारी, वनपाल भूषण भोये, वनरक्षक यमुना गावित या पथकाने कारवाई केली. खैराच्या लाकडांनी भरलेली ही पिकअप ताब्यात घेत नाशिकमधील म्हसरुळ डेपोत जमा करण्यात आली आहे.

या ठिकाणी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी वाहन जप्त करत पंचनामा केला. यात १० हजार रुपये किमतीचे खैर लाकूड व अडीच लाख रुपयांची पिकअप असा एकूण दाेन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित पिकअपचालकासह अज्ञात तस्करांविरोधात पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील पिंपळसोंड, उंबरपाडा, चिंचमाळ, बर्डा, मोहपाडा या भागात खैर तस्करांनी मोर्चा वळवला अाहे. भरदुपारी वनकर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून खैर लाकडाची तस्करी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील गत दीड दोन महिन्यापूर्वीची वनकर्मचाऱ्यांवर तस्करांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच तस्करांनी मोर्चा पिंपळसोंड भागात गुजरात सीमावर्ती भागातील जंगलाकडे वळविला आहे.

पुष्पा स्टाइलने तस्करी
गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात लाकडे सोडून रस्त्यावर सहजपणे आणून वनविभागाला चकवा देत ‘पुष्पा’ स्टाइल वापरून गाडी भरली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...