आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या फूटभर खोलीत गाडलेले पाइप, झेड आकारात जोडलेली जलवाहिनी, चेंबरचे निकृष्ट बांधकाम, वितरिकांची कामे करताना आराखड्याला दिलेला फाटा यामुळे तब्बल ६० फुटांहून अधिक उंचीचा जलकुंभ असतानाही जलवाहिनीद्वारे गुरुत्वाकर्षणाने ग्रामस्थांच्या नळापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यावर कडी करत ठेकेदाराने या जलकुंभाच्या खालीच १० अश्वशक्तीचा पंप जोडून योजनेची चाचणी घेण्याचा केलेला खटाटोपही निरर्थक ठरला. परिणामी एक कोटी २० लाखांची पाणीपुरवठा योजना राबवूनही शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता व ठेकेदाराच्या स्वाहाकारी वृत्तीमुळे तालुक्यातील पाथरे बुद्रुकमध्ये राबविण्यात आलेली राष्ट्रीय पेयजल योजना ग्रामस्थांसाठी मृगजळ ठरली आहे.
अधिकारी जबाबदार
जलवाहिन्या टाकताना पाण्याला कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये यासाठी त्या सरळ रेषेत असतील यावर आराखड्यात भर दिला जातो. मात्र, येथे ‘झेड’ आकारात जलवाहिनी टाकण्याचा प्रताप ठेकेदाराने केल्याने पाणी शेवटच्या टोकाला कसे पोहोचणार, हे कामाचे परीक्षण करणाऱ्या अभियंत्यांना काम पाहिल्यावर लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. ग्रामस्थांनी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत, प्रत्यक्ष कामाची पाहणी न करताच मोजमाप पुस्तिका भरल्याने अधिकारी व ठेकेदाराच्या ‘अर्थ’पूर्ण संगनमताने या योजनेची ‘वाट’ लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
कामे सुधारण्याच्या सूचना
ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर संबंधित कामाची जागेवर जाऊन पाहणी केली. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने झालेली कामे सुधारण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
- संजय मिस्तरी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि. प., नाशिक.
दुसरीकडेही भरले टेंडर
सुमार दर्जाची कामे करणाऱ्या या एजन्सीने तालुक्यातील इतरही गावातील पाणीपुरवठा योजनांचा ठेका घेण्यासाठी निविदा भरल्या आहेत. त्यामुळे पाथरेप्रमाणेच या गावांच्याही पाणी योजनांची ‘वाट’ लागणार की जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संबंधित एजन्सीवर कारवाई करणार, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.
..अशी केली चलाखी
पाणीपुरवठा योजनेच्या वितरिका टाकताना किमान एक मीटर खोली आवश्यक असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने अवघ्या एक ते दीड फूट खोलीत पीव्हीसी पाइप गाडले आहेत. अनेक ठिकाणी उघड्या डोळ्यांनी हे पाइप वरचेवर मोकळे असल्याचे दिसत आहे. बैल व ट्रॅक्टर नांगराच्या फाळाला लागून काही ठिकाणी या जलवाहिन्या उघड्या झाल्या आहेत. त्यावरून त्यांच्या खोलीचा अंदाज येतो. चेंबरचे काम अतिशय निकृष्ट केले आहे.
जीआय पाइपमध्येही कमाल
पक्का खडक असलेल्या ठिकाणी जीआय पाइपचा उपयोग केला जातो. पाथरेत पक्का खडक नसतानाही बहुतेक ठिकाणी वरचेवर जीआय पाइपचा उपयोग केला गेला. त्यावर पक्क्या काँक्रीटने बुजवण्याची तसदीही ठेकेदाराने घेतली नाही. अनेक ठिकाणी लिकेज झाल्याने वेल्डिंगचे टाके देऊन गळती थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.