आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकडवा पाणी योजनेचा वीजपुरवठा एक सेकंद खंडित झाला तरी आठ लाख लिटर पाण्याची तूट येते. एक्सप्रेस फीडर असूनही पंपिंग स्टेशनला होणारा वीजपुरवठा तब्बल दहा ते पंधरा वेळा खंडित होत असल्याने ७० ते ८० लाख लिटर पाण्याची कमतरता भासत आहे. परिणामी सिन्नरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कडवा पाणीपुरवठा योजनेला साकूर फाटा येथील वीज उपकेंद्रातून पुरवठा होतो. एक्स्प्रेस फीडर असूनही सुरळीत वीजपुरवठा होत नाही. महिनाभरापासून तर रोज आठ ते पंधरा वेळा वीज जाते. याशिवाय कमी दाबाने वीजपुरवठा होतो ते वेगळेच.
असे आहे पाणी तूट येण्याचे गणित : वीजपुरवठा एक सेकंद जरी खंडित झाला तरी वीजपंप जळू नये म्हणून ३० मिनिटानंतर सुरू केले जातात. त्यामुळे अर्ध्या तासाने पंप सुरू केल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पडण्यासाठी आणखी अर्धा तास जातो. हा एक तासाचा वेळ गेल्याने तब्बल आठ लाख लिटर पाण्याची तूट येते. २४ तासांत दहा ते पंधरा वेळा पुरवठा खंडित होत असल्याने ७० ते ८० लाख लिटरहून अधिक पाण्याची तूट येते आहे. महावितरणने पाणीपुरवठ्यासाठीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
..तर दोन दिवसांआड पाणीपुरवठा
वीजपुरवठा खंडित होत राहिल्यास दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा होऊ शकेल. पुरवठा सुरळीत राहिला तर नेहमीप्रमाणे दिवसाआड ४५ मिनिटे पाणी दिले जाईल. - हेमलता दसरे, अभियंता, नगरपरिषद
सोमवारी तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित
अवकाळी पावसामुळे सोमवारी पंपिंग स्टेशनचा तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित होता. सद्यस्थितीत २४ तासात दहा ते पंधरा वेळा वीज खंडित होत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा झाल्यास एकाच वेळी ४५० अश्वशक्तीचे दोन वीजपंप चालविला येत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.