आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:वीज पूर्ववत; मनमाडचा पाणीपुरवठा 19 दिवसांवरून पुन्हा 15 दिवसांआड

मनमाडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांना दिलासा, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांची माहिती

शहराला सध्या सुरू असलेला १९ दिवसांआड पाणीपुरवठा पुन्हा एकदा १५ दिवसांआड करण्यात आला आहे. अनियमित असलेल्या वीजपुरवठ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता वीजपुरवठा सुरळीत झाल्याने परिस्थिती सामान्य होऊन पुन्हा एकदा नागरिकांना १५ दिवसांआड पाणीवितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी दिली.

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वादळी पावसामुळे वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याने १५ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा १९ दिवसांआड करण्यात आला होता, तो आता पुन्हा १५ दिवसांआड होणार आहे. शहरासाठी २५ जून रोजी सोडण्यात येणारे पालखेडचे आवर्तन अचानक नऊ दिवस आधीच १६ जूनला रात्री तेही फक्त तीन दिवसांसाठी सोडल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली. घाईघाईने पाणी तलावात साठवण्यात आलेे. भरपावसाळ्यात १९ दिवसांआड पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.

धरणाने तळ गाठल्याने पाणी उचलण्यात अडचण
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने तळ गाठला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रेव्हीटी नसल्याने वीजपंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात वेळेवर व पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. जलशुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्याचा परिणाम शहरातील पाण्याच्या वितरणावर झाला आहे.